आता डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या कामाचा बोजा वाढणार
By Admin | Updated: July 30, 2014 23:55 IST2014-07-30T23:55:38+5:302014-07-30T23:55:38+5:30
ग्रामीण भागातील जनतेचे श्रम, वेळ व पैसा वाचावा, याकरिता राज्य शासनाने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ई- बॅकिंग सेवा सुरू करण्याची मोहिम सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतमधील डाटा एन्ट्री

आता डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या कामाचा बोजा वाढणार
पेंढरी(कोके) : ग्रामीण भागातील जनतेचे श्रम, वेळ व पैसा वाचावा, याकरिता राज्य शासनाने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ई- बॅकिंग सेवा सुरू करण्याची मोहिम सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतमधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या कामाचा बोजा आता वाढणार आहे.
महाआॅनलाईन प्रणालीतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक परिचालकाची (डाटा एन्ट्री आॅपरेटर) अल्पशा मानधनावर नियुक्ती करण्यात आली. त्या आॅपरेटरद्वारे संगणिकृत रहिवाशी, बीपीएल, नाहरकत प्रमाणपत्र असे १९ प्रकारचे दाखले देण्याचे काम सोपविण्यात आले. आता ग्रामस्तरावर आॅनलाईन ई- बॅकिंग सेवा सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागातील जनतेसारखेच आपआपल्या ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्राद्वारे पैसा हस्तांतरित करणे, ठेवी स्विकारणे, इलेक्ट्रीक बिल भरणे, मजुरांचे ई- पेंमेट, बँकेत खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, ड्राप्ट बनवणे, कर्ज प्रस्ताव करणे, लाभार्थ्यांना थेट अनुदान वितरित करणे, फोन, मोबाईल देयक भरणे, रेल्वे बस आरक्षण, मोबाईल रिचार्ज इत्यादी सुविधा ग्रामीण जनतेला मिळणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ई- बॅकिंगची सेवा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
या सुविधेमुळे राज्यातील तब्बल २१ हजार स्थानिक संगणक आॅपरेटरला काम मिळाले आहे. परंतु त्यांना महाआॅनलाईनकडून आठ हजार मानधन ठरले असताना फक्त तीन हजार ८०० रुपये मानधन दिले जात आहे. तेही तीन- तीन महिने मानधन मिळत नसल्यामुळे व आणखी ई- बँकिंगमुळे कामाचा व्याप व जबाबदारी वाढल्यामुळे मानधन वाढविण्याची त्यांची मागणी आहे.(वार्ताहर)