आता कॉन्टेक्ट ट्रेसींगवर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:26+5:302021-03-29T04:16:26+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या तसेच वाढते मृत्यू लक्षात घेता प्रशासनाने या आपत्तीचा दक्षपणे सामना करायचा असेल ...

आता कॉन्टेक्ट ट्रेसींगवर भर द्यावा
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या तसेच वाढते मृत्यू लक्षात घेता प्रशासनाने या आपत्तीचा दक्षपणे सामना करायचा असेल तर जिल्हाधिकारी, मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी या चार अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव तातडीने दूर व्हावा, जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या वाढवावी, निर्णयांच्या अंमलबजावणीची गती वाढवावी, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. दरम्यान, या सुचनांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी व जिल्ह्यातील टेस्टींगची संख्या वाढवत कॉन्टेक्ट ट्रेसींगवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विनंतीनुसार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, जि. प. अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अधिष्ठाता डॉ. हूमणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधीक्षक डॉ. गहलोत, मनपा आयुक्त राजेश मोहीते आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्हयात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्कीजन बेड्स जास्तीत जास्त संख्येने निर्माण करावे, खासगी डॉक्टरांच्या सेवा घ्याव्या, रूग्णांना पोस्टीक जेवण द्यावे, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा, कॉन्टेक्ट ट्रेसींग वाढवावे असे विविध निर्देश आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिले. लसीकरणात चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरावा अशी अपेक्षा ना. राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
बॉक्स
कोरोना चाचण्या वाढवाव्या-सुधीर मुनगंटीवार
बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता कोरोना चाचण्या आणखी वाढविण्याची मागणी केली. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ, नर्सेस यांची रिक्त पदे त्वरीत भरावी, अशा सूचना केल्या. कोरोना काळातील देयके प्रलंबित आहेत. अशी परिस्थीती राहिली तर प्रशासनाला कोण मदत करेल, असा सवालही त्यांनी केला. बेड मॉनिटरींग सिस्टीम उत्तम करावी, कॉल सेंटर निर्माण करावे, कंत्राटी कामगारांच्या आठ महिन्यांपासून थकित वेतनाकडेही त्यांनी लक्ष वेधले.