Now a Gram Sabha for Rural Development Plan | ग्रामविकासाच्या आराखड्यासाठी आता ग्रामसभा

ग्रामविकासाच्या आराखड्यासाठी आता ग्रामसभा

ठळक मुद्देलगबग सुरू : बाल व महिला सभा घेण्याचे दिले आहेत निर्देश

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षातील 'आमचा गाव आमचा विकास' या आराखड्यासाठी नागभीड पंचायत समितीच्या वतीने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे.
नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या आराखडयाच्या अनुषंगानेच १३ व १४ नोव्हेंबर रोजी गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. १३ नोव्हेंबरला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसंसाधन गट यांची तर १४ नोव्हेंबर रोजी महिला स्वयंसहाय्यता गटाचे ग्रामसंघ, ग्रामसेविका व ग्रामस्तरीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या गणस्तरीय कार्यशाळा मोहाळी, मौशी, पारडी ठवरे, बाळापूर (बुज), गोविंदपूर, तळोधी (बाळा), गिरगाव व सावरगाव येथे पार पडणार आहेत. या ठिकाणी पार पडणाºया कार्यशाळांना १०० प्रशिक्षणार्थी उपस्थित राहतील, असे अपेक्षित आहे.
या कार्यशाळा पार पडल्यानंतर १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभा घेण्याचे नियोजन पंचायत समितीने केले आहे. या ग्रामसभेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रभारी आधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ग्रामसभेपूर्वी बालसभा, मागास व उपेक्षित घटकांची सभा, वार्ड सभा, महिला सभा आदी प्रकारच्या सभा घ्याव्यात, अशा सूचना पंचायत समितीच्या वतीने सर्व सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.

हे अभिप्रेत
कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, सिंचाई, पंचायत विभाग, बांधकाम विभाग या व अन्य प्रत्येक विभागाची कामे या ग्रामसभेत नागरिकांकडून सूचविण्याचे अभिप्रेत आहे. या सूचविण्यात आलेल्या कामानुसारच पुढील आराखडा निश्चित होणार आहे.

या ग्रामसभेत गाव विकासाच्या दृष्टीने जी कामे सूचविण्यात येतील. त्यानुसार पुढच्या पाच वर्षात कामे होणार आहेत. म्हणूनच या ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी ग्रामसभेस उपस्थित राहणे गरजेचे आहे.
- प्रणाली खोचरे
गटविकास आधिकारी पं.स.नागभीड

Web Title: Now a Gram Sabha for Rural Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.