ंहवालदिल शेतकऱ्यांचे आता खरिपाकडे लक्ष
By Admin | Updated: April 20, 2015 01:12 IST2015-04-20T01:12:44+5:302015-04-20T01:12:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ंहवालदिल शेतकऱ्यांचे आता खरिपाकडे लक्ष
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्जाचा बोझा अजूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कमी झाला नाही. रबी हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच केले आहे. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेवर बरसेल व पाऊसही चांगला होईल, असा अंदाज वर्तविल्याने नेहमीच आशावादी असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता नव्याने पल्लवित होऊ पाहत आहे. कृषी विभागानेही खरीपासाठी नियोजन पूर्ण केले आहे.
२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील शेती खरडून निघाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. काही शेतकऱ्यांना तर खरीपातील एक दानाही हाती मिळाला नाही. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मायबाप सरकार धावून आले म्हणून शेतकऱ्यांनीही दु:खावर पांघरून घातले. मात्र राज्य शासनाची ही मदत झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अतिशय तुटपुंजी होती. काही शेतकऱ्यांनाही अद्यापही ही मदत मिळाली नाही, अशी ओरड होत आहे. शासकीय मदतीतून शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे जराही हलके झाले नाही.
उलट कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना वर्षभर त्याची दमछाक झाली.
त्यानंतर मागील खरीप हंगामात वेळेवर मान्सून बरसला. आतातरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली. मात्र वरूणराजाने अवकृपा दाखविणे सोडले नाही. प्रारंभी पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. कित्येक दिवस पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. कशबशी पेरणी केल्यानंतर ऐन पीक भरात येत असतानाही पुन्हा पावसाने दडी मारली. यातही शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. हे नुकसान रबीतही भरून निघाले नाही. रबी हंगामात अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.
आता काही दिवसात पुन्हा खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे. यावेळी हवामान खात्याने मान्सून वेळेवर बरसणार असे भाकित केले आहे. याशिवाय पावसाळ्यात वरूणराजाची कृपा चांगली असणार आहे, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या वृत्तामुळे हवालदिल शेतकऱ्यांची थोडीशी आशा पल्लवित होऊ लागली आहे.
यंदा कृषी विभागानेही आपले खरीपाचे नियोजन झटपट पूर्ण केले आहे. यावेळी चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर जिल्ह्यात खरीप पिकांची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावेळी पुन्हा कापसाचा पेरा वाढणार असे दिसून येत आहे. कापसाचे १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. तर धान १ लाख ७७ हजार ६८ हेक्टर व १ लाख १८ हजार ४७४ हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड होणार आहे.
लागोपाठ दोन वर्ष खरीपाने खिसा भरण्याऐवजी खिशाला कात्री लावली होती. यावर्षी तर खरीपाने भरभरून द्यावे, अशा आशाळभूत नजरेने शेतकरी खरीप हंगामाकडे बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)