आता मिळणार मताचा पुरावा

By Admin | Updated: September 16, 2014 01:47 IST2014-09-16T01:47:51+5:302014-09-16T01:47:51+5:30

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी

Now the evidence of the vote will be found | आता मिळणार मताचा पुरावा

आता मिळणार मताचा पुरावा

पहिल्यांदाच वापर : भंडारा क्षेत्रात होणार अंमलबजावणी
भंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कुणाला मत दिले याची खात्री पटवून देण्यासासठी पहिल्यादांच ‘व्होटर व्हेरिफयबल पेपर आॅडिट ट्रेल’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. इव्हीएममध्ये हेराफेरी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने ही उपाययोजना आणली आहे. पंसतीच्याच उमेदवाराला मत दिल्याची खात्री ‘स्क्रीन’वर बघून करता येणार असून याची अंमलबजावणी भंडारा विधानसभा क्षेत्रात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्या म्हणाल्या, मते कुणाला दिले याची खात्री करण्यासाठी भंडारा विधानसभेची निवड झाली असून या प्रणालीत मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवारांना झाले की नाही, याची पावती दिसणार आहे. उमेदवाराचे नाव, चिन्ह, यादीतील क्रमांकाचा समावेश त्यात राहणार आहे. नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवाराऐवजी अन्य उमेदवाराला मिळत असल्याचे दिसताच केंद्राध्यक्षांकडे तक्रार करता येणार आहे.
सात सेकंदानंतर प्रिंट झालेली पावती प्रिंटरला जोडलेल्या सिलबंद बॉक्समध्ये आपोआपच जमा होईल. ही मते मुद्रित स्वरूपात ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. या नव्या प्रणालीसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. या नव्या यंत्रणेमुळे हेराफेरीवर आळा घालण्यास मदत होणार आहे. या प्रणालीमुळे मतदारांमधील संभ्रम दूर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रायोगिक तत्वावर काही विधानसभा क्षेत्रात या प्रणालीचा वापर होणार असला तरी भविष्यात सर्वच निवडणुकीत या नव्या प्रणालीचा वापर होणार आहे. (नगर प्रतिनिधी)

विदर्भात तीन ठिकाणी प्रयोग : प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच होणार वापर
चंद्रपूर विधानसभेत मतदानाची निघणार पावती
चंद्रपूर : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या मतदारांच्या मतदानाची पावती निघणार आहे. या वेळी हा प्रयोग प्रथमच चंद्रपुरात होत आहे. यासाठी व्होटर व्हेरीफिएबल पेपर आॅडिट ट्रायल सिस्टम ही यंत्रणा वापरली जाणार आहे. सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींपुढे या यंत्रणेचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर करून ही घोषणा केली.
१२ सप्टेंबरपासून आचारसंहिता जाहीर होताच प्रशासन कामी लागले आहे. यशदा येथील प्रशिक्षणाहून परतताच आज सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने सकाळी राजकीय प्रतिनिधींची बैठ घेऊन निवडणूक आयोगाचे निर्देश स्पष्ट केले.
त्या नंतर पत्रकार परिषदेतून त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, यावेळी प्रथमच आयोगाने व्होटर व्हेरीफिएबल पेपर आॅडिट ट्रायल सिस्टम म्हणजे मतदान केल्यानंन आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान पडले का हे दर्शविणारे यंत्र वापरण्याचे ठरविले आहे. राज्यात आठ जिल्ह्यातील १७ मतदार संघात प्रायोजिक तत्वावार ही यंत्रणा वापरण्यात येणार असून यात विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि भंडारा या तीन मतदार संघांचा समावेश आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे गहाळ होती. त्यामुळे मतदानापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. मात्र, मतदार ओळखपत्र असणे म्हणजे मतदान करता येणे असे नाही. त्यामुळे आपलीे नावे यादीत आहेत अथवा नाहीत, याची खात्री मतदारांनी करावी, असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. नाव नोंदविण्याचा कार्यक्रम सहाही विधानसभा मतदार संघस्तरावर सुरू आहे. मतदार याद्या प्रत्येक तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा आयोगाने २८ लाख रुपये केली आहे. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकारचे २७ पथक गठीत करण्यात आहेत. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी केवळ ५० हजार रूपये रोख रक्कम सोबत बाळगता येईल. या काळात नागरिकांनीही आपल्यासोबत रोख रक्कम नेणे टाळावे, असे आवाहन करतानाच अतिशय अपवादात्मक परिस्थिती रोख रक्कम नेताना त्याची कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी रायकीय पक्षाची बैठक घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. प्रचार करण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची परवानगी घेणे बंधनकारक असून ज्या मतदार संघातील परवानगी घेतली त्या मतदार संघाबाहेर संबंधित वाहन वापरता येणार नाही. प्रचार सभासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीसाठी प्रत्येक मतदार संंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारीस्तरावर एक खिडकी योजना अंमलात आणली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नावनोंदणीसाठी १७ सप्टेंबरपर्यंत मुदत
ज्या मतदारांच्या नावांची नोंदणी झाली नाही, त्यांच्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या तारखेपयरंत नाव नोंदणी करणाऱ्यांची नावे मतदार याकदीत समाविष्ठ होणार आहेत. त्यानंतर ही नावनोंदणी करता येईल, मात्र ती नावे पुरवणी यादीत येतील.
एक नजर आकडेवारीवर
३१ आॅगस्टपर्यंत नोंदविलेल्या यादीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी एकूण १७ लाख ५० हजार ८९३ मतदारांची नोंद झाली आहे.
यात ९ लाख १० हजार पुरुष व ८ लाख ४० हजार ६७३ स्त्री मतदार आहेत.
छायाचित्र ओळखपत्र देण्यात आलेल्या मतदारांची संख्या १५ लाख ९९ हजार ५५४ आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ९५० मतदान केंद्र व १५ सहाय्यकारी मतदान केंद्र ठरविले आहेत.
नव्याने ३४ मतदान केंद्राचा प्रस्ताव आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
पेड न्यूजसाठी समिती
वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या पेडन्यूजवर देखरेख ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. विविध वाहिन्यांचा राजकीय पक्षांकडून देण्यात येणाऱ्या निवडणुकीसंबंधी जाहिरात या समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक असल्याचे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले आहे.

Web Title: Now the evidence of the vote will be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.