धानापाठोपाठ आता कापूसही संकटात
By Admin | Updated: September 13, 2014 23:46 IST2014-09-13T23:46:19+5:302014-09-13T23:46:19+5:30
मागील वर्षी सोयाबीनचे पीक आकस्मिक झालेल्या पावसात सापडल्याने चालु हंगामात सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळाले नाही. शेतकरी नगदी समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाकडे वळले आहे.

धानापाठोपाठ आता कापूसही संकटात
वरोरा : मागील वर्षी सोयाबीनचे पीक आकस्मिक झालेल्या पावसात सापडल्याने चालु हंगामात सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळाले नाही. शेतकरी नगदी समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाकडे वळले आहे. कपाशीचे पीक फुलावर असताना अचानक मर रोगाने कपाशी पिकावर आक्रमण केले असून कपाशीची झाडे उलमडून पडत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनच्या बियाणाची उगवण क्षमता दर्जेदार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खर्चाचे पीक असतानाही कपाशीची लागवड केली. हंगामाच्या सुरुवातीला पाऊस आल्याने कपाशीची लागवड करण्यात आली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार व तिबार कपाशीची लागवड करावी लागल्याने प्रारंभी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यानंतर कपाशीला आवश्यक असताना पाऊस पडत गेल्याने कपाशीची मशागत चांगल्या प्रकारे करता आली. काही दिवसांपूर्वी कपाशीचे पीक सर्वत्र चांगले असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी सुखाविला होता. सध्या कपाशीला पात्या फुले येत असून काही कपाशींना बोंड लागणे सुरू झाले आहे. असे असतानाच मागील काही दिवसात सातत्याने पाऊस पडला. सध्याची कपाशीची अवस्था पात्या फुले येण्याची असल्याने मूळ घट्ट असणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलाव्याने कपाशीच्या झाडाचे मूळ कमजोर झाले. मुळाचा व जमिनीचा संपर्क तुटत आहे. झाडाच्या खोडाला अन्न व पाणी मिळत नाही. त्यामुळे कपाशीचे झाडे उन्मळून पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)