२३३ शिक्षकांच्या १८ लाखांच्या घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:40+5:302021-04-23T04:30:40+5:30

राजुरा :येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागा अंतर्गत येत असलेल्या २३३ शिक्षकांनी वर्ष २०१९-२० मध्ये एलटीसीच्या नावाखाली बोगस बिले सादर ...

Notice to 233 teachers in Rs 18 lakh scam case | २३३ शिक्षकांच्या १८ लाखांच्या घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस

२३३ शिक्षकांच्या १८ लाखांच्या घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस

राजुरा :येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागा अंतर्गत येत असलेल्या २३३ शिक्षकांनी वर्ष २०१९-२० मध्ये एलटीसीच्या नावाखाली बोगस बिले सादर करून एकूण १७ लाख ८४ हजार ७२१ रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आले आहे. शिक्षकांच्या या बनवाबनवीचा प्रकार उघड होताच शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली. या गंभीर प्रकरणी जिल्हा परिषदने अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन संबंधित शिक्षकांकडून उचल केलेल्या रकमेच्या वसुलीवर भर दिला आहे. परंतु त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीस बगल देऊन पाठराखण करण्यात येत असल्याचा आरोप ब्लॅक पँथर फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष विजय चन्ने यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आजघडीला शिक्षकांचा शिक्षकी पेशा हा आदर्श मानला जातो. या पवित्र कार्यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असते. देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतो. पण याच शिक्षकांनी बोगसगिरी करून शासकीय निधीचा घोटाळा केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. २३३ शिक्षकांनी एलटीसीच्या नावाखाली खोटे बिल जोडून लाखोच्या निधीवर डल्ला मारल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. दरम्यान ऑगस्ट २०२० मध्ये जिल्हा परिषदेने या योजनेचे ऑडिट केले असता शिक्षकांची बनवाबनवी चव्हाट्यावर आली. ऑडिटमध्ये मुख्य २० बिंदूवर आपत्ती दर्शविण्यात आली आहे. घोटाळ्याचे प्रकरण उघड होताच वित्त व लेखा अधिकाऱ्याला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. आता या प्रकरणी अधिकारी व शिक्षक दोषी असतानासुद्धा त्यांची पाठराखण करण्यात येत असल्याचा आरोप विजय चन्ने यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हा परिषदसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Notice to 233 teachers in Rs 18 lakh scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.