म्हणे ‘डिकॉय’साठी कुणीच पुढे आले नाही..
By Admin | Updated: March 17, 2017 00:54 IST2017-03-17T00:54:00+5:302017-03-17T00:54:00+5:30
अवैध गर्भपात आणि गर्भलिंग चाचणी विरोधात सरकारची मोहीम २०११ पासून सुरू आहे.

म्हणे ‘डिकॉय’साठी कुणीच पुढे आले नाही..
आरोग्य विभागाची कबुली : गर्भलिंग निदान आणि गर्भपातविरोधी कायद्याची नीट अंमलबजावणीच नाही
चंद्रपूर : अवैध गर्भपात आणि गर्भलिंग चाचणी विरोधात सरकारची मोहीम २०११ पासून सुरू आहे. यावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. असे असले तरी गर्भलिंग निदान आणि गर्भपातविरोधी कायद्याची नीट अंमलबजावणीच नसल्याची कबुली खुद्द आरोग्य विभागाने गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली. एवढेच नाही तर, २०१२ पासून जिल्ह्यात डीकॉयसाठी कुणीच पुढे न आल्याने कुण्याही गुन्हेगार केंद्रसंचालकाला रंगेहात पकडता आले नसल्याची कबुली खुद्द जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दिली आहे.
मुलींचे घटते प्रामण आणि लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहात गुरूवारी पत्रकार परिषद झाली. त्या दरम्यान अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी ही कबुली दिली. मनपाच्या नोडल अधिकारी डॉ.अंजली आंबटकर यांच्यासह पोलीस व अन्न व औषधी विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्री भ्रुणहत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद झाली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर म्हणाले, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. जिल्ह्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग करणारा नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी आढळून आल्यास अशा व्यक्तीची सूचना द्यावी. त्यासाठी राज्य शासनाने बक्षिस योजना जाहीर केली आहे. संबंधित गुन्हेगाराविरोधात न्यायालयात खटला दाखल झाल्यावर २५ हजार रुपये बक्षिस सरकारकडून मिळण्याची तरतुद आहे.
मनपा क्षेत्रात ५७ तर ग्रामीण भागात ३० असे मिळून चंद्रपूर जिल्ह्यात सद्या ८६ अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यांच्या अहवालावरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सन २०१६ मध्ये २१६ डॉक्टरांच्या संदर्भात जिल्ह्यात तपासणी झाली, त्यापैकी २४ डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ४८ मेडीकल स्टोअर्सचीही तपासणी करण्यात आली आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूर जिल्हयाचे लिंग गुणोत्तर अधिक असल्याचा दावा यावेळी अधिकाऱ्यांनी केला.
(जिल्हा प्रतिनिधी)
काय आहे डिकॉय ?
पत्रकार परिषदेत डिकॉयचा उल्लेख अधिकाऱ्यांनी वारंवार केला. डिकॉयच मिळाली नाही, त्यामुळे कारवाई करता आली नाही, अशी हतबलताही त्यांनी प्रगट केली. हे डिकॉय काय आहे, याचा उलगडाही डॉ. मुरंबीकर यांनीच अखेर केला. सोनोग्राफी केंद्रावर २० आठवडे पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेला बनावट रूग्ण म्हणून पाठवायचे. त्या महिलेमार्फत डॉक्टरांशी झालेले गर्भपाताविषयक संभाषण रेकॉर्ड करायचे, त्यासाठी सांगतिलेली रक्कम ठरलेल्या दिवशी द्यायची. सापळा रचून संबंधित सोनोग्राफी संचालकाला अथवा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करायची, असा हा प्रकार आहे. यालाच ‘डिकॉय’ असे म्हणतात. मात्र असा डिकॉय प्रकार आरोग्य विभाग करतो, याची कल्पनाच नागरिकांना नाही, त्यामुळे प्रतिसाद कसा मिळणार असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर अधिकारी मात्र निरूत्तर झाले.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
असे प्रकार घडत असल्यास त्या संदर्भात माहिती देण्यासाठी सरकारने टोल फ्रि क्रमांक जाहीर केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ आणि १०४ या टोल फ्रि नंबरवर अनाधिकृत दवाखान्याची माहिती देता येणार आहे. या सोबतच नागरिकांना राज्य शासनाच्या ६६६.ेंूँ्रे४’ॅ्र.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवरही माहिती देता येणार आहे.
१५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत राबविणार धडक मोहीम
चंद्रपूर शहर, जिल्हा व सिमावर्ती भागात आरोग्य, महसूल, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकामार्फत १५ मार्च ते १५ एप्रिल या काळात जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताच्या घटनाक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. अनाधिकृत दवाखाने, बोगस डॉक्टर व गर्भपाताच्या औषध विकणाऱ्या मेडीकल स्टोअर्सची तपासणी करण्यात येणार आहे. सोबतच अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचे यावेळी या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.