लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किडनी विक्री प्रकरणातील दिल्ली येथील आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याला जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बुधवारी (दि. ७) न्यायालयाने डॉ. सिंग याचा जामीन अर्ज फेटाळला. तात्पुरता जामीन मंजूर करताना घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केले. शिवाय पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे डॉ. सिंग या प्रकरणात गुंतला असल्याने जामीन अर्ज नाकारण्यात आल्याचे समजते. आता डॉ. सिंगच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोलापूरचा डॉ. कृष्णा व हिमांशू यांना अटक केल्यानंतर डॉ. रवींद्रपाल सिंग आणि तामिळनाडूतील डॉ. राजरत्नम गोविंदसार्मीची नावे पुढे आली होती. डॉ. सिंगच्या अटकपूर्व जामिनावर अर्जावर तब्बल आठवड्यानंतर ही सुनावणी झाली. दरम्यान, डॉ. राजरत्नम गोविंदस्वामीची मदुराई न्यायालयाने ट्रान्झिट बेल मंजूर केल्याची माहिती आहे. या घडामोडींनी तपास अधिक गतीने पुढे जाण्याची शक्यता आहे.
आरोपींचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये
पोलिसांनी डॉ. कृष्णा, हिमांशू आणि डॉ. सिंग यांचे मोबाइल जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात काही महत्त्वाचा डेटा पोलिसांच्या हाती लागला असून, त्यातून रुग्णालयातील इतर डॉक्टरांची नावेही पुढे आली आहेत. मात्र, बहुतांश डेटा डिलिट करण्यात आल्याने तो रिकव्हर करण्यासाठी सर्व मोबाइल नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बांगलादेशातील रुग्णाचा मृत्यू
दोन किडनीपीडितांसह बांगलादेशातील एका किडनी पीडित रुग्णाचा त्रिची येथील रुग्णालयात किडनी काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर बांगलादेशीतील मृतकाच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देऊन प्रकरण दडपण्यात आल्याचा उल्लेख डॉ. कृष्णा व डॉ. सिंग यांच्या चॅटिंगमधून आढळून आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सर्व आरोपींचे एकच लोकेशन
किडनी प्रत्यारोपण करण्यात आलेल्या रुग्णांची बहुतांश नावे पोलिसांच्या हाती आली आहेत. ज्या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्या काळात डॉ. सिंग, डॉ. गोविंदस्वामी, डॉ. कृष्णा व हिमांशू यांचे मोबाइल लोकेशन त्रिची येथील एकाच रुग्णालयात असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाइल लोकेशनच्या आधारे या रॅकेटची व्याप्ती स्पष्ट होत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Web Summary : Dr. Ravindrapal Singh's bail plea in the kidney sale case was rejected by Chandrapur court for violating conditions. Investigation reveals mobile data, a Bangladesh patient's death, and location evidence linking suspects.
Web Summary : गुर्दा बिक्री मामले में आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंह की जमानत याचिका चंद्रपुर अदालत ने शर्तों के उल्लंघन के लिए खारिज कर दी। जांच में मोबाइल डेटा, बांग्लादेशी मरीज की मौत और संदिग्धों को जोड़ने वाले स्थान के सबूत मिले।