निराधार योजनेचे अनुदान प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:36+5:302021-03-31T04:28:36+5:30
इंदिरानगर परिसरात सुविधांचा अभाव चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते व नाल्यांचे बांधकाम ...

निराधार योजनेचे अनुदान प्रलंबित
इंदिरानगर परिसरात सुविधांचा अभाव
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते व नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. नाल्या न झाल्याने सांडपाणी तुुंबून राहते. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाने या परिसरात सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार
वरोरा : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. अनेक ग्रामीण भागातील प्रस्ताव सादर करण्यात आल्याने समस्या सुटणार आहेत.
क्रीडागंणाअभावी युवकांना अडचण
लखमापूर : कोरपना तालुक्यातील मध्य ठिकाण व सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गडचांदूरला ओळखले जाते. या शहराची लोकसंख्या जास्त असल्याने क्रीडाप्रेमी जास्त आहेत. परंतु या क्रीडाप्रेमींना योग्य सराव करण्यासाठी एक सुसज्ज क्रीडा संकुल नसल्याने युवकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात जागेची कमतरता असल्याने तालुक्यातील अनेक क्रीडापटू सराव करण्यापासून वंचित आहेत. शहरातील अनेक युवक-युवती पोलीस भरतीची तयारी करताना दिसतात. परंतु सरावासाठी एकही क्रीडा संकुल नसल्याने मिळेल त्या जागेवर किंवा महामार्गावरच सराव करावा लागत आहे.
सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात
जिवती : तालुक्यातील शेणगाव आणि हिमायतनगर येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. सदर उद्घाटनाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती सभापती अंजना पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष गणपत आडे, सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख, अशपाक शेख, सुग्रीव गोतावळे, देविदास साबणे, शंकर कांबळे, भीमराव पवार, नंदाताई मुसने, पांडुरंग फुकडवाड, शाबीर पठाण उपस्थित होते.
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम
ब्रम्हपुरी : नगरपरिषद क्षेत्रातील वाढते कुत्र्यांचे पैदासावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेने बुधवारपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व उपचार मोहीम सुरू केली आहे. ब्रम्हपुरी शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले होते. दरम्यान, यावर नियंत्रण आणण्यासाठी साकोली येथील पीपल फॉर अनिमल्स संस्थेची नगर परिषदेने नियुक्ती केली आहे. या मोहिमेत भटक्या मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरु आहे. ही मोहीम आरोग्य निरीक्षक रामदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला
कोरपना : येथील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसून अपडाऊनच करणे अधिक पसंत करतात. यामुळे नागरिकांची कामे जलदगतीने होत नाही. परिणामी कामे खोळंबली जात आहे. या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, सहाय्यक निबंधक , कृषी उत्पन्न बाजार समिती, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आदी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचारी अप-डाऊनलाच पसंती देताना दिसतात. त्यामुळे मुख्यालयी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेमच आहे. या स्थळी गडचांदूर, वणी ,राजुरा , चंद्रपूर,वरोरा, बल्लारपूर, भद्रावती, नागपूर, आदिलाबाद आदी ठिकाणावरून कर्मचारी अपडाऊन करतात. त्यामुळे त्यांना यायला अनेकदा विलंब होतो. तसेच बरेच कर्मचारी वेळेआधीच निघून जात असल्याने कामे रेंगाळली जात आहे. याचा फटका मात्र दूर अंतरावरुन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांची अडचण
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मधल्या काळात शिथिलता मिळाली. त्यामुळे काही रेल्वे सुरु करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला. मात्र पॅसेंजर अद्यापही बंदच आहे. त्यातच आता कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवास करावा लागत आहे.