विद्युत झटक्याने नीलगाईचा मृत्यू
By Admin | Updated: November 28, 2015 02:05 IST2015-11-28T02:05:54+5:302015-11-28T02:05:54+5:30
तालुक्यातील आष्टा शेतशिवारात रानटी डुकरापासून शेतीच्या रक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेत निलगाय अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

विद्युत झटक्याने नीलगाईचा मृत्यू
भद्रावती : तालुक्यातील आष्टा शेतशिवारात रानटी डुकरापासून शेतीच्या रक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेत निलगाय अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री घडली.
आष्टा येथील प्रमोद खिरटकर यांचे सोनेगाव रोड चंदयी नाल्याजवळ शेत आहे. या शेतातील कापूस या पिकामध्ये जिवंत विद्युत तारा लावण्यात आल्या होत्या. त्यात २६ च्या रात्री निलगाय अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही निलगाय मादी असून तिचे वय सात वर्ष आहे. ही बाब येथील एकाला माहिती होताच याबाबत वनविभागाला माहिती दिली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर लावलेल्या तारा, खुंट्या व काही रानटी डुकरांच्या हाडांचे अवशेष सापडले.
वनपरिक्षेत्र अधिकारी एन.यू. शिंदे, क्षेत्रसहायक राऊत, विकास शिंदे, वनरक्षक एस.एन. गाताडे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. वृत्तलिहेपर्यत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तारा लावल्या प्रकरणी कुणावरही कारवाई केली नव्हती. (शहर प्रतिनिधी)