नव्या पोलीस अधीक्षकांची जिल्ह्यात इनिंग सुरू
By Admin | Updated: May 29, 2015 01:34 IST2015-05-29T01:34:23+5:302015-05-29T01:34:23+5:30
जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची इनिंग सुरू झाली आहे.

नव्या पोलीस अधीक्षकांची जिल्ह्यात इनिंग सुरू
चंद्रपूर : जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची इनिंग सुरू झाली आहे. गुन्हेगारी वर्तुळात दबदबा असलेल्या संदीप दिवाण यांनी आल्याआल्या जिल्ह्याच्या परिस्थितीचा अभ्यास सुरू केला आहे. यानंतर त्यांची दमदार इनिंग सुरू होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.
चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाल्यावर त्यांनी गुरूवारी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील प्रश्न आणि समस्या पत्रकारांकडून समजून घेण्यासोबतच आपल्या भावी योजनाही त्यांनी यावेळी सांगितल्या.
दारूबंदी आणि चंद्रपूर शहरातील वाहतूक या दोन विषयासोबतच डोके वर काढू पहाणाऱ्या गुंंंडगिरीचा बिमोड करताना कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराच संदीप दिवाण यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, चंद्रपूर शहरात लावण्यात आलेल्या ९३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा योग्य उपयोग करण्यावर आपला भर राहील. शहरात वाढलेली वाहतूक, रस्त्यांवर होणारी गर्दी आणि वाहतुकीचे नियम मोडणारे नागरिक आणि युवकांची दखल वेळीच घेतली जाईल. शहरातील सर्व चौकात असलेला पोलिसांचा स्टॉफ वाढविण्यासोबत सर्व चौकातील पोलिसांच्या हाती वॉकीटॉकी दिली जाईल. या माध्यमातून गुन्हेगारी आणि वाहतुकीवर वचक ठेवला जाईल. शहरात लावलेले ९३ कॅमेरे पुन्हा वाढविण्यापेक्षा लावलेल्या कॅमेऱ्यांचे मेंटनन्स करणे आणि त्यांच्या दुरूस्ती व देखभालीसाठी एजंसी नियुक्त करणे हे पहिले काम असेल. शहरातील काही चौकातील कॅमेऱ्यांची रेंज कमी असल्याने गरजेनुसार नवे कॅमेरे लावले जातील. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तयार करून संबंधितांकडे पाठविला जाईल, असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
दारूबंदीची अंमलबजावणी करणार कडक
जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्याने त्याची कडक अंमलबजावणी करण्यावर आपला भर असेल, असे नव्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ९३ मुंबई दारूबंदी कायद्यानुसार आरोपींना अटक केल्यावर वारंवार एकच आरोपी पकडला जात असेल, तर कायदा कठोर होईल. जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण प्रस्ताव पाठविणार असून अशा आरोपींचा बाँड रद्द करणे, तडीपारीची कारवाई करणे, आदी शिक्षेचे मार्ग अवलंबिले जातील. दारूबंदीसाठी बफर झोन ठरवून त्यासाठी सेंट्रल एक्साईजची मदत घेतली जाईल. जिल्ह्यातील महिला बचत गट, दारूबंदीे समित्यांचा डाटा तयार करून सर्वांचे क्रमांक घेतले जातील. या सर्वांना संपर्क क्रमांक देवून दारूविक्रीची माहिती घेतली जाईल. दारूबंदीची माहिती देणाऱ्या नागरिकांना कंट्रोल रूममधून सरप्राईज कॉल करण्याचीही योजना आहे. दारूबंदीसाठी जिल्ह्यात ४३ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र या सर्व नाक्यांवरील कर्मचाऱ्यांच्या वेळा, ठिकाणे आणि कर्मचारी वारंवार बदलण्याचीही योजना त्यांनी जाहीर केली.