हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे नवे संकट
By Admin | Updated: June 5, 2015 01:12 IST2015-06-05T01:12:12+5:302015-06-05T01:12:12+5:30
शेतात ओलीत करण्यासाठी कृषीपंप बसविण्यात आले आहे. यासाठी पुरवण्यात येत असलेल्या कृषीपंपांना विद्युत मीटर लावण्यात आले आहे.

हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे नवे संकट
बेजबाबदारपणा : रिडिंग न घेताच कृषिपंपाच्या बिलात अधिकचा भुर्दंड
नांदाफाटा: शेतात ओलीत करण्यासाठी कृषीपंप बसविण्यात आले आहे. यासाठी पुरवण्यात येत असलेल्या कृषीपंपांना विद्युत मीटर लावण्यात आले आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रिडिंग न घेताच विजेचे भरमसाठ बिल पाठवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भरणा करावा लागत असून अचानक आलेल्या अधिकच्या बिलामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे शेतकऱ्यांपुढे नवेच संकट निर्माण झाले आहे.
आधुनिक शेतीच्या दृष्टीने व निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर अथवा बोअरवेलच्या माध्यमातून शेतकरी पाणी पुरवठा करीत आहे. यासाठी हजारो रुपये खर्च करुन विद्युत मीटर व कृषीपंप बसविण्यात आले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे जितकी विद्युत वापरता येईल, त्यानुसार विद्युत कर आकारण्याचे धोरण आहे. यासाठी प्रत्येक गावात मीटरची रिडिंग घेणे गरजेचे आहे. मात्र रिडिंग घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी कार्यालयातूनच अंदाजवार खर्ची विद्युत आकडे नोंदवून बिले तयार करीत आहे. उन्हामुळे अनेक शेतकरी कृषीपंपांचा वापर शेतात करीत नाही. केवळ भाजीपाला पिके घेणारे काही शेतकरीच कृषीपंपाचा पाणी पुरवठ्यासाठी वापर करताना दिसतात.
त्यामुळे असे शेतकरी वगळता इतरही शेतकऱ्यांना त्यांच्याप्रमाणे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत बिले विद्युत वितरण कंपनीमार्फत पाठविण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पादनात बरीच घट झाली आहे. यातच शेतकऱ्यांना अतिपावसामुळे दुबार- तिबार पेरणीला सामोरे जावे लागले.
यासाठी सुरुवातीलाच बियाणांचा खर्च अधिक लागला. हंगामात तर उत्पादन हाती आले. मात्र पाहिजे तो भाव पिकाला मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही भरुन निघालेला नाही. अशा परिस्थितीत येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यातच आता कृषीपंपाची बिले येत असलेल्या ती कशी भरावी या चिंतेत शेतकरी आहे. अनेक शेतातील कृषीपंपाचे मीटर बंद अवस्थेत असल्याचेही समजते. याबाबत काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रारी दिल्या आहे.
परंतु अद्यापही मीटर बदलवून वा नवीन मीटर शेतकऱ्यांना बसवून देण्याचे आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसत आहे. कृषीपंपाचा वापर नसताना शेतकऱ्यांना किमान बिल येईल, अशी अपेक्षा असते. परंतु जादा बिलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. (वार्ताहर)