भामरागडच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 30, 2014 23:55 IST2014-07-30T23:55:59+5:302014-07-30T23:55:59+5:30
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे

भामरागडच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले व विकासाचे आश्वासन दिले. परंतु हे सारे हवेतच विरले आहे.
भामरागडच्या विकासाचे चित्र मात्र बदलले नाही. १०० टक्के आदिवासी गाव असलेला भामरागड हा तालुका आहे. अनेकदा समस्यांच्याबाबत आंदोलन झालीत. परंतु त्यातून काहीही हाती पडले नाही. पावसाळा आला की, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा यांना नद्या तुडुंब भरून वाहतात. येथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागतो. मागील दोन दशकापासून पुराच्या या समस्येमुळे भामरागडचे नागरिक त्रस्त आहेत. १९८६ मध्ये महापूर येऊन भामरागडला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भामरागडच्या १०० ते ८० गावाचा संपर्क पुरामुळे दरवर्षी तुटतो. भामरागडच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही आपले दुकान हलवावे लागते. पोलीस ठाण्याच्या समोरून पुराच्या पाण्याचा नाला वाहतो व रस्ते बंद होऊन जातात. ठेंगणे व अरूंद पूल असल्याने अनेक दिवस पुलावरचे पाणीही उतरत नाही. आरेवाडा, कोठी येथील नाले भरून वाहत असल्याने रस्ता बंद पडून जातो. नागरिकांना उपचारासाठीसुध्दा भामरागडला येणे पावसाळ्यात कठीण होऊन जाते. मागील २० वर्षापासून ही समस्या आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नाही. पालकमंत्री उपमुख्यमंत्री २००६ मध्ये येथे आले होते. आढावा बैठक घेतली. पर्लकोटाचा ठेंगणा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर काहीही झाले नाही. पुराचे पाणी राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत येते. ५ दिवस जनजीवन विस्कळीत होते. नव्या पुलाच्या बांधकामाकडे तसेच ठेंगणे व अरूंद रपटे रूंद करण्याकडे लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष आहे. कुमरगडा, ताडगाव, नारगुंडा हे मार्ग दरवर्षीच बंदच होऊन जातात. अनेतदा बांधकाम विभाग तुटलेले पूल व खचलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी येत नाही. नागरिक व पोलीस श्रमदान करून रस्ते तयार करतात व कशीतरी बससेवा सुरू करून घेतात. भामरागडच्या या समस्येवर कधीतरी कायम तोडगा निघेल काय, हाच खरा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)
युवतीचा मृत्यू
चामोर्शी : २३ वर्षीय मुलगी एकटीच घरी असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून युवतीला मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजता लक्ष्मणपूर येथे घडली. मृत्यू झालेल्या युवतीचे नाव संध्या सुधाकर बोंडे असे आहे. संध्या दुपारच्या सुमारास घरी एकटीच असताना एका ३० वर्षीय अज्ञात इसमाने घरी येऊन तिला मारहाण केली.