गरज देशात, कोटींची घोषणा नेपाळात

By Admin | Updated: August 4, 2014 23:38 IST2014-08-04T23:38:38+5:302014-08-04T23:38:38+5:30

देशातील विकासासाठी निधीची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये १० हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या मागास भागात किंवा

Need of country, crores in Nepal | गरज देशात, कोटींची घोषणा नेपाळात

गरज देशात, कोटींची घोषणा नेपाळात

अजित पवारांची मोदींवर टीका : चंद्रपुरातील राकाँचा मेळावा
चंद्रपूर : देशातील विकासासाठी निधीची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये १० हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या मागास भागात किंवा जम्मू-काश्मिरात मदतीची गरज असताना ही मदत नेपाळमध्ये दिली जावी, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी चंद्रपुरातील पक्षाच्या निर्धार मेळाव्यात उपस्थित केला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. गृहनिर्माण व पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहीर प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी मोदींना टीकेचे लक्ष्य करून अजित पवार म्हणाले, देशाच्या संसदेचे सत्र सुरू असताना पंतप्रधान मात्र विदेश दौऱ्यावर आहेत. देशात अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या त्यांच्या सरकारने अगदी महिनाभरात सर्वसामान्यांच्या रेल्वेचे भाडे वाढविले.
महाराष्ट्रासारख्या राज्याचे बजेट ४५ हजार कोटींचे असताना एकट्या गुजरातसाठी त्यांनी आवश्यकता नसतानाही ६० हजार कोटींच्या बुलेट ट्रेनला मंजुरी दिली.
ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावर काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. सन्मानजक जागावाटप झाले तर ठिक नाही तर मैदान आपलेच आहे. जागावाटप करताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळाचा विचार व्हावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात काँग्रेसला २७ तर राष्ट्रवादीला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यात त्यांनी दोन तर, आम्ही चार जिंकल्या. याचाही विचार व्हायला हवा.
राज्य सरकारमधील सत्तापक्ष या नात्याने केलेल्या विकासाचा आणि सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरीव अर्थसहाय्य जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून ुदिल्याचा दावाही त्यांनी केला.
राकाँचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी गेल्या ३० वर्षातील राजकीय स्थितीचा आढावा भाषणातून घेतला. कृषी मंत्रीपदाच्या काळात शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेससोबत गेल्या निवडणुकीत मैत्री केली होती. या वेळीही त्यासाठीच मैत्रीचा हात पुढे केला असला तरी आमचा स्वाभिमान कायम आहे. जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजे, असे ते म्हणाले.
ना. सचिन अहीर म्हणाले, राष्ट्रवादीने समाजातील सर्व घटाकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत पराभव झाला असला तरी विधानसभेतील यशासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील मनपा चालविता येत नाही ते महाराष्ट्र कसा काय चालविणार, अशी कोपरखळीही त्यांनी शिवसेनेला मारली. महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब साळुंंखे यांचीही भाषणे झालीत. मंचावर अ‍ॅड. एकनाथराव साळवे, अ‍ॅड. बाबा वासाडे, मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. गोंिवंद भेंडारकर, शोभाताई पोटदुखे, सुदर्शन निमकर, अमर बोडलावार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Need of country, crores in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.