निसर्गाचा लहरीपणा अन् शासनाची उदासीनता

By Admin | Updated: September 11, 2015 01:20 IST2015-09-11T01:20:16+5:302015-09-11T01:20:16+5:30

शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

Nature's apathy and indifference to the government | निसर्गाचा लहरीपणा अन् शासनाची उदासीनता

निसर्गाचा लहरीपणा अन् शासनाची उदासीनता

कष्टकऱ्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा : शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
गोवरी : शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मागील वर्षीच्या तुलनेतत यावर्षी चांगला पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. हंगामाच्या सुरवातीला दोन दिवस चांगला पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे निसर्गाची अवकृपा आणि शासनाची उदासिनता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
आज, उद्या पाऊस येईल, या आशेवर बळीराजा असताना ऐनवेळी पावसाने हुलकावणी दिली. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अंकुरण्यापूर्वीच जमिनीत करपूण गेले. पै पै जुळवून उभी केलेली तुटपूंजी मिळकत शेतीवर खर्च झाली.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाने दगा दिल्याने उसनवारी करुन आणलेल्या कर्जाचा डोंगर पुन्हा वाढला आहे. वर्षभराचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांचा वार्षिक बजेट कोलमडला आहे. शेतीत दिवस-रात्र मेहनत करुन शेवटी हातात काहीच येत नाही. त्यामुळे शेतकरी मनातून पार खचून गेला आहे. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, वाढत जाणारा कर्जाचा डोंगर आणि संसाराचा भार पेलताना शेतकऱ्यांची शक्ती दु:ख सहन करण्यापलीकडची झाली आहे.
शेतीला दिवसेंदिवस येत असलेली अवकळा कायम असल्याने उत्तम शेती म्हणायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पिकांच्या फळधारणेसाठी सध्या पावसाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी महागडे रासायनिक खते दिले. मात्र सप्टेंबर महिन्यातच पाऊस गायब झाल्याचे चित्र दिसत असल्याने पुन्हा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा जात असल्याने त्याचा फटका शेतपिकांना बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागते. सध्या शेतपिकांच्या वाढीचा व फळधारणेचा काळ आहे. शेतपिकांवर अज्ञात रोगाने अतीक्रमण केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसरात असल्याने उभ्या पिकांत जंगली जनावरांचा धुमाकूळ सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत भरदिवसा उभे पीक उपटून मोठ्या प्रमाणात शेतपिकांची नासधूस सुरु आहे. मात्र त्यावर आळा घालणारी यंत्रणा शेतकऱ्यांकडे नसल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून जागल करावी लागत आहे. शेतकऱ्यांविषयी शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेती पिकवूनही घामाचे दाम मिळत नसेल तर वर्षभर होत असलेली ससेहोलपट काय कामाची, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Nature's apathy and indifference to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.