रबीवर निसर्गाचा आघात
By Admin | Updated: February 8, 2016 00:56 IST2016-02-08T00:56:05+5:302016-02-08T00:56:05+5:30
शासन नेहमीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकऱ्यांवरच कोपू लागल्याचे दिसते.

रबीवर निसर्गाचा आघात
थंडीच्या अभावाचा पिकांवर परिणाम
चंद्रपूर : शासन नेहमीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकऱ्यांवरच कोपू लागल्याचे दिसते. यंदा पावसाअभावी खरिपात शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागले. नैराश्यात असलेल्या अर्ध्या शेतकऱ्यांनी रबीकडे पाहिलेसुध्दा नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा रबीचा पेरा निम्म्यावर आला. आता सिंचनाची सोय नाही आणि थंडीही पडली नाही. त्यामुळे उत्पादनातही ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्याअभावी करपली. त्यामुळे खरीप हंगामात यावर्षी ४० टक्के उत्पादन घटल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. असे असले तरी प्रत्यक्षात ५० ते ६० टक्के उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खरिप हंगामात जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. अनेकांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. बँका, सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकले नाही. कर्ज फेडले तर वर्षभर खाणार काय, हादेखील प्रश्न गंभीर.
खरीपात बसलेला आघात अनेक शेतकरी सहन करू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी करायची हिंमतच दाखविली नाही. मात्र काहींनी आता रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले नुकसान थोडेतरी भरून निघेल, या आशेपोटी रबी हंगाम करायची तयारी दर्शविली. रबी पीक पेरणीसाठी त्यांनी बियाण्यांची जुळवाजुळव केली. डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसऱ्यांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.
मागील वर्षी जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना रबीतून उत्पादनही बऱ्यापैकी झाले होते. यावर्षीदेखील एक लाखांहून अधिक हेक्टरवर रबीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. रबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र कृषी विभागाचे हे नियोजन शेतकऱ्यांनी फोल ठरविले. यावर्षी रबीत मागील वर्षीच्या तुलने निम्म्यावरही पिकांची पेरणी झाली नाही. केवळ ६५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे.
यंदा पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊसच झाला नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती होती. ती खरीही ठरली. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागली. तरीही पीक पाहिजे तसे शेतकऱ्यांना जगविता आले नाही. सद्यस्थितीत पिकांची स्थिती पाहिली की निसर्गाने रबी हंगामावर आघातच केल्याचे दिसून येते. यामुळे मोठ्या आशेने आणि हिंमतीने पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना रबीतही जबर नुकसान सोसावे लागणार आहे.
जमिनीत पाणी मुरलेच नाही
यंदा पाऊसच अत्यल्प पडल्याने जमिनीतही पाणी मुरु शकले नाही. नदी, तलाव, बोड्यात पाणी नाही. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पाचीही स्थिती नाजुक आहे. त्यामुळे रबीत पिकांना पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम व अंमलनाला धरणातून शेतकऱ्यांना पाणी देण्यात येते. मात्र यावेळी धरणातूनही कराराप्रमाणे पाणी देण्यात आले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे उत्पादन घटले आहे.