नागभीड ग्रामपंचायतीचा रेकार्ड पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: July 23, 2014 23:31 IST2014-07-23T23:31:27+5:302014-07-23T23:31:27+5:30
नागभीड ग्राम पंंचायतीच्या विविध योजनांमध्ये तब्बल साडे सहा लाख रुपयांचा अपहार प्रकरणी नागभीड पोलिसांनी ग्रामपंचायतीचे विविध रेकार्ड ताब्यात घेतल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.

नागभीड ग्रामपंचायतीचा रेकार्ड पोलिसांच्या ताब्यात
नागभीड : नागभीड ग्राम पंंचायतीच्या विविध योजनांमध्ये तब्बल साडे सहा लाख रुपयांचा अपहार प्रकरणी नागभीड पोलिसांनी ग्रामपंचायतीचे विविध रेकार्ड ताब्यात घेतल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.
सरपंच बेबीताई श्रीरामे, उपसरपंच प्रदीप तर्वेकर आणि ग्रामविकास अधिकारी अशोक पंधराम यांनी संगणमत करुन तेरावा वित्त आयोग, पायका, वृक्षलागवड योजना आदी योजनांमध्ये घोळ करून साडे सहा लाख रुपयांचा अपहार केला, असा आरोप आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रा.पंं. सदस्य मो. जहागीर कुरेशी यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरीचे संवर्ग विकास अधिकारी सानप यांची चौकशी समिती नेमली. या समितीने या गैरव्यवहाराची सखोल चौकशी केली आणि या चौकशीत साडे सहा लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशी अहवालाच्या निष्कर्षावरुन जि.प. च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी नागभीडचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. या निर्देशावरुन संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी २ जून २००१४ रोजी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अटक होईल, या भीतीने सरपंच आणि उपसरपंच काही दिवस फरारही होते. पण नंतर त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता.
या पार्श्वभूमीवर नागभीड पोलिसांनी नागभीड ग्रामपंचायतीचा रेकार्ड ताब्यात घेतल्याने ही ग्रामपंचायत आणखी चर्चेत आली आहे. (तालुका प्रतिनिधी)