Municipal Corporation fines 2,191 citizens | महापालिकेचा २,१९१ नागरिकांना दंड

महापालिकेचा २,१९१ नागरिकांना दंड

ठळक मुद्देगत महिन्यात चार लाख ४७ हजार ६९० रुपये वसूल : थुंकणे, मास्क न वापरणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या दोन हजार १९१ लोकांवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली. जून महिन्यात नियमांचे पालन न करणाºया या नागरिकांकडून चार लाख ४७ हजार ६९० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणाºया नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवणाºया व अवैध खर्रा विक्री करणाºया दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फे मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत. याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकान सुरु ठेवत असल्याचे व अवैध खर्रा विक्री करताना आढळुन आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी चंद्रपुरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा १८० लोकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात आली आहे. मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला दोन मास्कसुद्धा देण्यात येत आहे.
सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील यांच्या नेतृत्वात तीनही झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे, विवेक पोतनूरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे यांच्या माध्यमातून या कारवाया करण्यात आल्या.

रूग्ण वाढतेय नागरिक गंभीर नाही
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. असे असले तरी नागरिक मात्र गंभीर असल्याचे दिसत नाही. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने काही नियम सांगितले आहेत. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे, खोकलणे हे प्रकार सुरूच आहेत.

Web Title: Municipal Corporation fines 2,191 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.