'महागाईची साडेसाती म्हणजे भाजप' खासदार बाळू धानोरकर यांची खोचक टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 16:30 IST2021-10-27T14:44:39+5:302021-10-27T16:30:03+5:30
शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते दर माता-बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

'महागाईची साडेसाती म्हणजे भाजप' खासदार बाळू धानोरकर यांची खोचक टीका
चंद्रपूर : मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याची खोचक टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ते गोंडपिपरी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
या सात वर्षात देशातील शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला वर्गासह सर्वच घटक असमाधानी असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते दर माता-बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. मोदी सरकारची ही साडेसात वर्षे जणू महागाईची साडेसातीच असल्याचे धानोरकर यावेळी बोलताना म्हणाले.
आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्यात आपली पूर्ण सत्ता आहे. त्यामुळे, आता या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पूर्ण ताकतीने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद यामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकायला हवा, त्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन धानोरकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना आमदार आमदार सुभाष धोटे यांनी देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले. सामान्य नागरिकांना आता काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. यादृष्टीने गावा-गावात काँग्रेस विचारधारा पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही आमदार धोटे यांनी केले.
गोंडपिपरी तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवा काँग्रेस, सेवा दल, अनुसूचित दलच्यावतीने स्थानिक कन्यका सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यात शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे, शिवसेनेचे हरमेल डांगीजी यांच्यासह शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी, यावेळी आमदार सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे आदींची उपस्थिती होती.