पानठेला चालकांना वेठीस धरल्यास आंदोलन
By Admin | Updated: August 11, 2014 23:51 IST2014-08-11T23:51:13+5:302014-08-11T23:51:13+5:30
आठवडाभरापूर्वी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी या परिसरात येवून सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश बजाविल्याने जिल्ह्यातील हजारो पानठेला चालक बेरोजगार

पानठेला चालकांना वेठीस धरल्यास आंदोलन
गोंडपिपरी : आठवडाभरापूर्वी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी या परिसरात येवून सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश बजाविल्याने जिल्ह्यातील हजारो पानठेला चालक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून पानठेलाधारकांवर कारवाई केली जात असल्याने आता शासनाने पानठेला चालकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी यशवंत ठुसे यांनी दिली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात रोजगाराची वाणवा असल्यामुळे हजारो बेरोजगार पानठेला सुरू करून त्याद्वारे स्वयंरोजगार करीत आहेत. या रोजगाराच्या भरोशावर हजारो पानठेले चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या परिसरातील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर राज्यात भटकंती करावी लागत आहे. अशातच काही बेरोजगार पानठेला उभारून उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी आणल्यास हजारो कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळणार आहे.
गोंडपिपरी तालुका मागासवर्गीय आहे. या भागात शासकीय उद्योग नसल्याने रोजगार मिळविण्यासाठी त्यांना पानठेला व्यवसाय करावयास भाग पडत आहे. शासनाने कायद्याची अंमलबजावणी करण्याअगोदर पानठेला चालकांना पेंशन लागू करावी. त्यानंतरच गोंडपिपरी तालुक्यातील पानठेले बंद करावे, अशी मागणी यशवंत ठुसे यांनी दिला आहे. हजारो कुटुंब नेस्तनाबूत करणारी दारूचे दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी त्याबाबत आश्वासनही दिले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न यशवंत ठुसे यांनी उपस्थित केला आहे. यावर तत्काळ प्रशासनाने निर्णय घेवून बेरोजगार होऊ घातलेल्या युवकांप्रती शासनाने सहानुभूती दाखविण्याची मागणी ठुसे यांनी पत्रकातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)