कन्हाळगाव अभयारण्यासाठी हालचाली वाढल्या
By Admin | Updated: July 10, 2014 23:31 IST2014-07-10T23:31:22+5:302014-07-10T23:31:22+5:30
ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या बझर झोनमधील गावांचा प्रश्न अद्यापही सुटला नसताना नव्याने कन्हाळगाव या अभयारण्याच्या निर्मीतीसाठी शासनस्तरावर आणि वनविभागाच्या स्तरावर हालचाली

कन्हाळगाव अभयारण्यासाठी हालचाली वाढल्या
चंद्रपूर : ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या बझर झोनमधील गावांचा प्रश्न अद्यापही सुटला नसताना नव्याने कन्हाळगाव या अभयारण्याच्या निर्मीतीसाठी शासनस्तरावर आणि वनविभागाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वनविभागाने यासाठी २६ हजार ५०१ हेक्टर वनक्षेत्रात हे अभयारण्य उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अद्याप अधिसूचना निघालेली नसली तरी, सर्व तयारी मात्र अंतीम टप्प्यात आली आहे.
या अभयारण्याच्या निर्मीतीला अजूनतरी काही काळ अवधी असला तरी, यासाठी आतापासूनच विरोधाचा सूर उमटणे सुरू झाले आहे. विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या अभयारण्यासाठी आपला विरोध व्यक्त करून भविष्यात स्थानिक जनतेचे आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविल्याने हा मुद्दा भविष्यात संघर्षाचा ठरणार असे चित्र दिसत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बफर झोन असे मिळून तीन हजार किलोमीटरचे जंगल असूनही नव्या अभयारण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अभयारण्याच्या विरोधामागील कारण सांगताना शोभाताई फडणवीस म्हणाल्या, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, आणि मूल, तालुक्यातील शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. कोठारी वनपरिक्षेत्र आणि मूल तालुक्यातील भेजगाव ते बेंबाळ तसेच पोंभूर्णा तालुक्यातील गावे निस्तार हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. वन्य प्राण्यांसाठी अभयारण्य तयार करून आदिवासींना बेघर करण्याचे धोरण सरकारने आखले असावे, अशी टिका फडणवीस यांनी यावेळी केली. बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल तालुक्यातील जनतेने याचा विरोध करावा, आवश्यक्ता भासल्यास याविरूद्ध न्यायालयात दाद मागू, असेही त्या म्हणाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)