आज शाळा बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:26+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकांना समाजकल्याण सहआयुक्त प्रसाद कुलकर्णीच्या जाचक त्रासाबद्दलही या निवेदनात माहिती देण्यात आली होती.

आज शाळा बंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळा पिट्टीगुडा ता. जिवती येथे कार्यरत अधीक्षक एस.एस.पवार यांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलीे. ही घटना शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडवून देणारी असून आश्रमशाळा प्रशासनातील भोंगळ कारभार उघड करणारी आहे. दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना एकत्र येत समन्वय समितीच्या माध्यमातून २७ डिसेंबरला जिल्हाभरातील शाळा बंद करण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले आहे. दरम्यान, जि.प. समोर शिक्षकांनी गुरुवारी निदर्शने देऊन मागणीकडे लक्ष वेधले.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकांना समाजकल्याण सहआयुक्त प्रसाद कुलकर्णीच्या जाचक त्रासाबद्दलही या निवेदनात माहिती देण्यात आली होती. हे निवेदन देवून दोन दिवस होत नाही तोच पवार यांच्या शाळा परिसरात झालेल्या आत्महत्येने या आश्रमशाळेत किती अनागोंदी कारभार माजला आहे, हे स्पष्ट होते. याप्रकरणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.