त्या अपघातामुळे आवळगाववर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:23+5:302021-03-29T04:16:23+5:30
आवळगाव : गावात कामधंदा नाही, रोजगार नाही म्हणून कामगार आपल्या व परिवाराची पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून ऊस ...

त्या अपघातामुळे आवळगाववर शोककळा
आवळगाव : गावात कामधंदा नाही, रोजगार नाही म्हणून कामगार आपल्या व परिवाराची पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून ऊस तोडणी, धान लावणी, कापूस वेचणी, मिरची तोडणे अशी मिळेल ती कामे करण्यासाठी बाहेरगावी जात असतात. बाहेरगावावरून आणलेल्या कमाईतून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेली भटकंती कामगारांच्या जीवावर बेतली. असेच कामासाठी बाहेर गेलेले आणि होळीसाठी घरी परत येणाऱ्या चार कामगारांचा गडचिरोली जिल्ह्यातील अपघातात मृत्यू झाला. यातील दोन कामगार आवळगाव व एक कामगार कुडेसावलीचा आहे.
आवळगाव, हळदा, बोडदा, कुडे सावली येथील रहिवासी असलेले शेतमजूर, मजूर वर्ग तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. मिरची तोडणीचे काम आटोपून ते पिकअप वाहन भाड्याने घेऊन होळीच्या सणानिमित्त स्वगावी परत येत होते. परत येत असता चौडमपल्लीजवळ चंदनखेडी फाट्यालगत आष्टी- आलापल्ली मार्गावर अहेरी आगाराची शिवशाही बस व पिकअप वाहन यांची समोरासमोर धडक होऊन घटनास्थळी वाहन चालकासह तीन कामगार ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये आवळगाव येथील नयना प्रभाकर निकुरे व देवाजी खोकले
तर कुडेसावली येथील एकाचा समावेश आहे. यात शुभम प्रभाकर निकुरे, पुष्पा देवाजी खोकले, निराशा जुमनाके, सत्यम जुमनाके सर्व रा. आवळगाव, तानाबाई आवारी, अर्चना आवारी रा. हळदा हे जखमी झाले. अपघातामुळे ऐन होळीच्या दिवशी आवळगाव व कुडेसावली गावात शोककळा पसरली आहे.