पंतप्रधानांच्या भाषणासाठी समस्यांचा डोंगर
By Admin | Updated: September 6, 2014 01:41 IST2014-09-06T01:41:46+5:302014-09-06T01:41:46+5:30
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद याचे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवाच असे निर्देश शिक्षण विभागाने दिले.

पंतप्रधानांच्या भाषणासाठी समस्यांचा डोंगर
चंद्रपूर : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण आणि विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद याचे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवाच असे निर्देश शिक्षण विभागाने दिले. त्या दृष्टीने काही शाळांना टीव्ही संच बसविला. मात्र अनेक शाळेत टीव्ही संच नसल्यामुळे त्यांना या प्रसंगापासून मुकावे लागले. काही ठिकाणी रेडीओ लावून भाषण ऐकविण्यात आले. मात्र दुर्गम भागातील शाळांमध्ये टीव्ही असूनही दूरदर्शनवर चक्क क्रिकेट सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांचे भाषण शालेय विद्यार्थ्यांना ऐकविण्यासाठी शिक्षकांनी बरीच धावपळ केली. शिक्षण विभागाने कोणत्या शाळेत टीव्ही संच आहेत, याचा आढावाही घेतला. काही शाळांनी टीव्ही संचांची व्यवस्था केली. मात्र बहुतांश शाळा टीव्ही संचाची जुळवाजुळव करू शकल्या नाही. जिल्ह्यातील बहुतांश शाळेत टीव्ही संच नसल्याने गावातील शाळेशेजारी ज्या घरात टीव्ही आहे, अशा घराचा आधार घेऊन कार्यक्रम ऐकवण्याचा प्रयत्न केला. चंद्रपुरातील काही शाळांनी मोठी स्क्रीनची व्यवस्था केली होती.
पटांगणात ही स्क्रीन ठेवून पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्यात आले. काही रेडीओचे कनेक्शन लाऊड स्पिकर जोडून प्रक्षेपण ऐकविण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यात बहुतांश जि.प. शाळेत टीव्ही संच उपलब्ध नाही त्यामुळे अनेकांनी कार्यक्रमच बघितला नाही, असे निर्दशनास आले आहे. ब्रह्मपुरी शहरात खाजगी शाळेत पंतप्रधानाचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले. परंतु ग्रामीण भागात पारडगाव, सायगाव, मालडोंगरी, गणेशपूर, अड्याळ, खेळ या गावात टीव्ही संच असल्याने भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याची तयारी करण्यात आली. बल्लारपूर तालुक्यात प्रारंभी, शाळेत प्रोजेक्टर लावण्याचा काहींनी विचार केला. मात्र, ते लावणे अवघड दिसल्यानंतर टीव्हीनेच शाळांनी काम निभावले. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच टीव्ही असल्यामुळे किती विद्यार्थ्यांना भाषण नीट ऐकू आले आणि मोदींना नीट बघता आले, हा प्रश्नच आहे. ज्या शाळांमध्ये दोन पाळ्या भरतात, अशा शाळांनी सकाळच्या पाळीतील विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता शाळेत बोलाविले.
काही शिक्षकांनी टीव्ही आपल्या घरुन शाळेत आणले. मात्र, केबलचा खर्च शाळांना करावा लागला. हा खर्च अर्थात शिक्षकांनी शेअर करुन उचलला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याकरिता खास मंडप उभारले. पंतप्रधानानी मोलाचे मार्गदर्शन केले ते आवडल्याची प्रतिक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे शिक्षक दिन भरीव वाटला असेही काहींचे म्हणणे पडले. (शहर प्रतिनिधी)