आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:42+5:302021-07-19T04:18:42+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या सावटाने चक्क दोन वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते दहावीपयर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही कोरोनाची दहशत ...

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!
चंद्रपूर : कोरोनाच्या सावटाने चक्क दोन वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते दहावीपयर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने व आरोग्य विभागाने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पालकांमध्ये दहशत आहे. मात्र, मुलाची शैक्षणिक प्रगती खुंटू नये, यासाठी आपल्या काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवित आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात ६१७ माध्यमिक शाळा आहेत. ज्या गावात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहेत. अशा गावातील आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा १५ जुलैपासून कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १५२ शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरीही विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले नसल्याने पालकांत कोरोनाची भीती आहे.
बॉक्स -
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघाेळही करा!
मुले शाळेमध्ये इतरांच्या संपर्कात येत असतात. तसेच खेळत बागडत असतात. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अनुमान आरोग्य विभागांनी व्यक्त केला आहे. परिणामी पालकांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत कायम आहे. त्यामुळे शाळेतून मुले घरी आल्यानंतर पहिले त्याला अंघोळ करायला लावून, कपडे बदलवायला सांगत आहेत. शाळांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाल्यास पुन्हा शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता पालक व्यक्त करीत आहेत.
बॉक्स
अ) मास्क काढू नये.
ब) वारंवार हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावे.
क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी. दरराेज हाच क्रम ठेवावा.
बॉक्स
कोरोना संसर्ग कमी असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेत काळजी घेतच मुलांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, सततच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बातम्या ऐकत असल्याने भीती वाटते. पण, मुलांना किती दिवस घरीच ठेवणार. त्यामुळे शाळेत पाठवत आहे.
-स्वप्नाली रायपुरे,
पालक
-----
गेल्या दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला हाेता. त्यात अनेकांचा काेराेनाने मृत्यू झाला. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी प्रमाणात असला तरी तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे. त्यामुळे भीती वाटते.
-रंजना गेडाम,
पालक
------
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाली आहे. मागील दोन वर्षांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, ते प्रभावी नाही. त्यामुळे मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात राहावा यासाठी शाळेत पाठवित आहे.
- वसुधा गणवीर,
पालक