मुलीच्या वाढदिवसानंतर अवघ्या काही तासातच आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 20:17 IST2022-04-18T20:16:46+5:302022-04-18T20:17:09+5:30
Chandrapur News एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे घडली.

मुलीच्या वाढदिवसानंतर अवघ्या काही तासातच आईची आत्महत्या
चंद्रपूर : मुलगी एक वर्षाची झाली. त्यादिवशी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
करिश्मा पंधराम असे मृत महिलेचे नाव असून, ती वरोरा शहरातील माढेळी नाका शिवाजी प्रभागातील रहिवासी आहे. राहुल पंधराम, पत्नी करिश्मा व त्यांची एक वर्षाची मुलगी शिवाजी प्रभागात वास्तव्यास आहे. राहुल यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस १६ एप्रिल रोजी होता. वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिका वाटून आप्तेष्टांना बोलावण्यात आले होते. वरोरा शहरातील एका लाॅनमध्ये मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला.
घरात सर्वत्र आनंद असताना वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी १७ एप्रिलला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करिश्माने घरातच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्या मंडळींनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आईने आत्महत्या केल्याने समाजमनच सून्न झाले. सर्वत्र आनंदी आनंद असताना करिश्माने हे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही. मुलीच्या वाढदिवसाला उपस्थित झालेल्या आप्तेष्टांना दुसऱ्या दिवशी मोठ्या जड अंतःकरणाने करिश्माच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावे लागले. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. एक वर्षाची चिमुकली आईविना पोरकी झाली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.