मशागतीसाठी गहाण शेतीची परस्पर विक्री
By Admin | Updated: July 30, 2014 23:57 IST2014-07-30T23:57:03+5:302014-07-30T23:57:03+5:30
गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीपैकी साडेतीन एकर जमीन एका इसमाकडे वर्षभरासाठी गहाण ठेवली. उधार घेतलेल्या रकमेची

मशागतीसाठी गहाण शेतीची परस्पर विक्री
शेतकऱ्याची फसवणूक : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल
वरोरा : गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीपैकी साडेतीन एकर जमीन एका इसमाकडे वर्षभरासाठी गहाण ठेवली. उधार घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड केल्यानंतर शेतीची पुनर्विक्री करून देण्याबाबतचा करारनामासुद्धा झाला होता. मात्र शेतकऱ्याला जराही शंका येऊ न देता त्या शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार वरोरा तालुक्यातील येन्सा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरोरा तालुक्यातील येन्सा येथील रमेश गुलाब अवघडे यांच्याकडे १७ एकर शेतजमिन असून मागील वर्षी ओल्या दुष्काळामुळे ते आर्थिक विंवचनेत होते. त्यांंनी ६० हजार रुपयांच्या कर्जासाठी साडेतीन एकर शेतजमिन चिकणी येथील दादाजी कर्डक यांच्याकडे गहाण ठेवली. शेतजमिन गहाण ठेवताना एक वर्षात ६० हजार रुपयांच्या कर्जापोटी १ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु ६० हजार रुपये देताना अघवडे यांनी त्या शेतीची विक्री करून द्यायची आणि व्याजासह रक्कम परत मिळाल्यानंतर पुन्हा त्या शेतीची विक्री अवघडे यांना करून दिली जाईल. अशी अट कर्डक यांनी ठेवली होती. असे अवघडे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार झालेल्या करारपत्रावर खांबाडा येथील पंढरी भोयर, दिनेश धोटे, बंडू मेश्राम हे साक्षीदार होते, असे अघवडे यांनी म्हटले आहे. अवघडे यांनी सर्वांवर विश्वास ठेवून ६० हजार रुपये घेतले व साडेतीन एकर शेतीची विक्री करून दिली. तसेच सहा महिन्यांपूर्वी अवघडे यांनी व्याजासह द्यावयाच्या रकमेपैकी ८० हजार रुपये कड्डक यांना दिले. दरम्यान सदर साडेतीन एकर शेतजमिन कड्डक यांनी नागपूर येथील व्यक्तीला परस्पर विकल्याची माहिती अवघडे यांना मिळाली. त्यामुळे अवघडे यांनी तातडीने तलाठी कार्यालय गाठून सत्यता जाणून घेतली असता त्यांना मिळालेली माहिती खरी असल्याचे समजले.
या संदर्भात कड्डक यांना जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने अवघडे यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने अवघडे यांंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडत असलेल्या बळीराजाचा या माध्यमातून बळी घेण्याचे प्रकार वाढत आहे. आणखी काही प्रकरणेसमोर समोर येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)