विजय मराठेविरुध्द आणखी गुन्हे दाखल
By Admin | Updated: August 16, 2014 23:23 IST2014-08-16T23:23:17+5:302014-08-16T23:23:17+5:30
मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयाने फसविले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना बनावट स्वाक्षऱ्या करून शेती घेण्याचे व खोटे दस्तावेज तयार करण्याचे परत एक

विजय मराठेविरुध्द आणखी गुन्हे दाखल
पोलीस कोठडी : खोटे दस्तावेज तयार केले
दुर्गापूर : मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयाने फसविले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना बनावट स्वाक्षऱ्या करून शेती घेण्याचे व खोटे दस्तावेज तयार करण्याचे परत एक घबाड उघडकीस आले आहे. याबाबत पोलिसांनी मराठेविरुध्द आणखी गुन्हे दाखल केले आहे. आज शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हाजर करण्यात आले. न्यायालयाने २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२००८ मध्ये विजय मराठेने वीन फायनान्स अॅन्ड आॅटो डील नावाची एक फायनान्स कंपनी उघडली. यात ५ टक्के व्याज व रक्कम दुप्पटीचे आमीष दाखवून शेकडो गुंतवणूकदाराकडून कोट्यवधी रुपये गुंतवून घेतले. सुरुवातीला त्याने ग्राहकांना त्यांचा विश्वास बसावा म्हणून एका वर्षानंतर दुप्पट रकमेचे चेकही दिले. मुदत संपल्यावर चेक बाऊन्स होत होते. पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्याच्याविरूद्ध ३० गुंतवणूकदारांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना मराठेने खोट्या स्वाक्षरी करून शेतीचे दस्तावेज तयार केल्याचे घबाड उघडकीस आले. मोरवा गावात डंभारे नामक इसमाची शेती होती. त्या शेतीचा न्यायालयात वाद सुरू होता. सदर शेतीच्या वारसदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या मारून २०१० मध्ये इसारपत्र तयार केले. नंतर २२ जुलै २०१४ मध्ये परत बनावट स्वाक्षऱ्या करून वकिलामार्फत नोटरी करवून सदर शेतीचे खोटे दस्तावेज तयार केले. पोलिसांनी कलम ४२० व कलम ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्ह्यात वाढ केली आहे. तपासात आणखी घबाड बाहेर येण्याची शक्यता पोलीस सुत्राने व्यक्त केली.(वार्ताहर)