बल्लारपुरात मोर्चा आणि आंदोलन
By Admin | Updated: August 12, 2014 23:40 IST2014-08-12T23:40:45+5:302014-08-12T23:40:45+5:30
बल्लारपूर तालुका आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा तसेच बल्लारपूर कृती समितीच्या वतीने प्रदूषण विरोधात घंटानाद तथा ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे मंगळवारी

बल्लारपुरात मोर्चा आणि आंदोलन
बल्लारपूर : बल्लारपूर तालुका आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा तसेच बल्लारपूर कृती समितीच्या वतीने प्रदूषण विरोधात घंटानाद तथा ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे मंगळवारी बल्लारपुरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी लक्षणीय होती.
अनुसूचित जमातीत धनगर व तत्सम जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी येथील खांडक्या बल्लाळशाह यांच्या समाधी स्थळापासून आदिवासी बांधवानी मोर्चा काढला. मुख्य मार्गाने घोषणाबाजी करुन येथील तहसीलदार बी. डी. टेळे यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यात आले. सामाजिक आंदोलनामुळे १९७६ मध्ये अनुसूचित जमातीची राज्यस्तरावर सूची तयार करण्यात आली. मात्र आजतागायत आदिवासींचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास झाला नाही. परिणामी आजही आदिवासी समाज यातना भोगत आहे. समाजाचे शोषण होत आहे. अशातच अनुसूचित जमातीचे आरक्षण अन्य तत्सम जातीचे घटक मागत आहेत. या अन्यायासाठी समाजाला रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागत असल्याचे मत पंचायत समितीचे सभापती अॅड. हरीश गेडाम यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जमातीचे क्षेत्रबंधन हटवून संविधानात्मक देशात राज्यावार सूचीचा फायदा घेण्याचे षड्यंत्र केले जात आहे. खऱ्या आदिवासी समाजाला दूर करण्याचे कारस्थान केले जात आहे. आदिवासी समाजाच्या घटनात्मक आरक्षणावर दावा करण्याचा कट केला जात आहे. हा अन्याय आदिवासी समाज सहन करणार नाही, असा इशारा आदिवासी बचाव कृती समितीचे अध्यक्ष गिरीधर कोडापे, सचिव चरणदास शेडमाके, सभापती अॅड. हरीश गेडाम, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, दिवाकर पेंदाम यांनी यावेळी दिला. मोर्चामध्ये सुनील कोवे, सुधाकर कन्नाके, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, कोर्टिमक्ताचे सरपंच दिलीप सोयाम, किन्ही येथील उपसरपंच जीवनकला आलाम, किसन आलाम, जुमनाके, राकेश कुळसंगे, विनोद आत्राम यांच्यासह बल्लारपूर शहरातील व ग्रामीण भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)