अन् आभाळातील चांदणे जमिनीवर अवतरले!

By Admin | Updated: November 21, 2015 00:47 IST2015-11-21T00:47:01+5:302015-11-21T00:47:01+5:30

कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले.

The moonlight in the sky appeared on the ground! | अन् आभाळातील चांदणे जमिनीवर अवतरले!

अन् आभाळातील चांदणे जमिनीवर अवतरले!

मजुरांची कमतरता : वेचणीअभावी शेत झाले कापसाचे पांढरे रान
प्रकाश काळे गोवरी
कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले. मात्र शेतकऱ्यांची वेदना तसुभरही कमी झाली नाही. मजुरांची वानवा आणि वेचणीअभावी कापूस झाडावर दिवसा लखलखत आहे. त्यामुळे शेत आता कापसाचे पांढरे रान झाल्याने जणू आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे.
शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. परिस्थितीच गुलाब बनून जगणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुणाचीही साथ उरली नाही. शेतात कापूस फुटून आहे. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला अजुनही प्रारंभ केला नाही. झाडावर पांढरे सोने लोंबकळत पडल्याने कोणत्याही क्षणी कापूस मातीमोल होण्याचा धोका आहे. परंतु, सारी परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाल्याने शेतकरी पार कोलमडून गेला आहे. कापूस वेचणीचे भाव वधारले. मात्र त्या तुलनेत कापसाचे दर वाढले नाही. कापूस वेचणीला मजूरांच्या शोधात शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. परंतु, मजुरांची वानवा असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पहाटे घरून मजुरांच्या शोधात निघालेला शेतकरी बाप निराश मनाने हताश होऊन रिकाम्या हाताने घरी परतत आहे. तर काही शेतकऱ्यांनी परप्रांतातून मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली आहे. हा सारा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र वर्षभर उसनवारी करून शेतीवर केलेला खर्च एका धर्माधात पाण्यात जाईल, या भितीपोटी शेतकरी स्वत:च कापूस वेचणीच्या कामाला लागला आहे.
घरातील चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच कापूस वेचणीच्या कामात गुंतले आहे. कुटूंबातील लहान मुलेही कष्टकरी बापाला कापूस वेचणीसाठी आधार झाली आहेत. कापूस वेचणीसाठी परप्रांतातून आणलेल्या मजूरांना गरजेपोटी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याच कुटूंबात राहण्याची जागा उपलब्ध करून दिली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून असल्याने राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही.
शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे सोने उन्हाने लखलखायला लागले आहे. कापूस वेचणीचे दर वाढवूनही मजूर मिळणे कठिण असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पांढऱ्या सोन्याची होत असलेली परवड थांबता थांबायलाही तयार नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मात्र शासकीय यंत्रणेला त्यावर उपाय शोधता आला नाही. कापूस वेचणीला मजुरांची वानवा असल्याने हिरवेगार दिसणारे शेत कापसाने पांढरे झाले आहे. त्यामुळे आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास आश्चर्यचकीत करणारा आहे.

Web Title: The moonlight in the sky appeared on the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.