शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; आरोपीस कारावास
By परिमल डोहणे | Updated: December 19, 2023 13:08 IST2023-12-19T13:08:19+5:302023-12-19T13:08:30+5:30
सावली प्रथमवर्ग न्यायालयाचा निकाल

शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; आरोपीस कारावास
चंद्रपूर : शेतात काम करणाऱ्या महिलेची छेडछाड करुन तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस सावली प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी अक्षय जगताप यांनी १ वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कमलाकर भाऊजी झरकर (३५) रा कवठी तालुका सावली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ऑगस्ट २०२१ सावली तालुक्यातील एका गावात फिर्यादी महिला शेतात एकटी काम करीत होती. ही संधी साधून कमलाकर झरकर याने तिची छेडछाड करून विनयभंग केला. याबाबतची तक्रार पीडित महिलेने सावली पोलिसात केली. सावली पोलिसांनी भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक शाशिकर चिचघरे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात न्यायलयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायधिशानी सर्व पुरावे तपासून आरोपीस भादंवि कलम ३५४ अंतर्गत १ वर्षाचा कारावास व पाच हजरांचा दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसाच्या अधिक कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्याचे कामकाज प्रथमवर्ग न्यायालयात सुरू असताना सरकारी अभियोक्ता अवी डोलकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. तसेच पैरवि अधिकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल सादिक शेख यांनी भूमिका बजावली.