चिमुकल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; मुख्याध्यापक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 20:45 IST2021-10-04T20:45:28+5:302021-10-04T20:45:53+5:30

Chandrapur News चंद्रपुरात शाळेचा मुख्याध्यापकच चिमुकल्या मुलींशी अश्लील चाळे करीत असल्याची घृणास्पद बाब पुढे आली आहे.

Molestation of minor student; Headmaster arrested | चिमुकल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; मुख्याध्यापक गजाआड

चिमुकल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; मुख्याध्यापक गजाआड

ठळक मुद्देवर्षभरापासून शाळेतच सुरू होता हा घृणास्पद प्रकार

 

चंद्रपूर : मुख्याध्यापकच चिमुकल्या मुलींशी अश्लील चाळे करीत असल्याची घृणास्पद बाब पुढे आली आहे. याची माहिती होताच सोमवारी शाळा सुरू होताच काही गावकरी जाब विचारण्यासाठी शाळेत गेले होते. तेव्हा मुख्याध्यापकाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले आणि पोलिसांकडे संरक्षण मागितले. पोलीस पोहोचताच मुख्याध्यपकाचेच बिंग फुटले. हा मुख्याध्यापक वर्षभरापासून अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने बल्लारपूर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भाऊराव तुमडे (५६, रा. विसापूर) याला कलम ३७६, ए, बी. एफ, ४, ६, ८ १२ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखव करून अटक केली आहे. ही लांच्छनास्पद घटना बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम येथील जि. प. शाळेत घडली.

पोलीस सूत्रानुसार, हा मुख्याध्यापक पुस्तक वाटप वा अन्य कारणाने विद्यार्थिनींना शाळेत बोलावित होता. अशातच तो विद्यार्थिंनीशी अश्लील चाळे करायचा. ही बाब एका विद्यार्थिनीने आपल्या पालकाला सांगितली. या पालकाने गावकऱ्यांना सांगितली. सोमवारी शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू झाल्याने गावकरी जाब विचारण्यासाठी दुपारी शाळेत गेले. आता आपले बिंग फुटेल या भीतीपोटी या मुख्याध्यापकाने स्वत:ला शाळेतील एका खोलीत कोंडून घेतले. आपले गावकऱ्यांपासून रक्षण करावे, यासाठी त्याने बल्लारपूर पोलिसांना भ्रमणध्वनी केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता या मुख्याध्यापकाचे घृणास्पद कृत्य पुढे आले. यानंतर पालकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापक भाऊराव तुमडे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हा मुख्याध्यापक वर्गातील इतर विद्यार्थ्यांना साफसफाईच्या बहाण्याने बाहेर पाठवित होता. अशातच प्रकारे पाचव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला वर्गात ठेवून तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. ही घटना त्या मुलीने आपल्या पालकाला सांगितल्याने त्याचे हे कृत्य बाहेर आले. राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. बल्लारपूर येथील सहायक पोलीस निरीक्षक रमीज मुलानी, विकास गायकवाड, शैलेंद्र ठाकरे यांनी मुख्याध्यापकाला घटनास्थळावरून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Molestation of minor student; Headmaster arrested