ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
भद्रावती : तालुकास्थळाला जोडणाऱ्या ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघात होत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भान्सी रस्त्यावर जागोजागी खड्डे
सावली : तालुक्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. भान्सी रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली.
रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण
मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसापूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण कोरोना संसगार्पासून कारवाई थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.
सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. पण ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदार हैराण आहेत. काही कामे कासवगतीने सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी निधीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
जिवती : परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
भाजीबाजाराच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
चंद्र्रपूर : येथील गंजवाॅर्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये भाजीपाल्याचा कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.