लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मोबाइलमुळे लहान थोरापासून ज्येष्ठांच्या झोपेच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. परिणामी अनेकांना निद्रानाशासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर नियंत्रणात करावा, असा सल्ला मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांनी दिला आहे.
सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत आजची तरुण पिढी ही मोबाइल इन्स्टाग्रामवर व्हिडीओ किंवा फेसबुकवर रिल्स बघण्यात व्यस्त दिसून येतात. काहीजण तर रात्री १२ ते १ किंवा त्यापेक्षा अधिक वेळेत मोबाइल बघत बसतात. परिणामी स्क्रीन टाइम वाढतो. सेल फोन आणि टॅब्लेट सर्व उच्च प्रमाणात निळ्या प्रकाशासह एलईडी तंत्रज्ञान वापरतात. जेव्हा संध्याकाळच्या वेळी निळ्या प्रकाशाच्या संपर्कात येता, तेव्हा शरीरात मेलाटोनिन तेवढे बाहेर पडत नाही आणि तुमचे झोपेचे चक्र विलंबित होऊन व्यत्यय निर्माण होतो.
त्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन विविध आजाराच्या कुरकुरी वाढतात. याशिवाय रात्री व्यवस्थित झोप झाली नाही की दुसऱ्या दिवशी आपसुकच स्वभावात चिडचिडपणा येतो. परिणामी मोबाईलचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.
२० मिनिटांनी घ्या ब्रेक. जर आपण सतत मोबाइल किंवा संगणकावर काम करत असू तर प्रत्येक २० मिनिटांनी ब्रेक घेणे गरजेचे आहे. अन्यथा डोळ्याची समस्या उद्भवू शकते.
झोपेचे दोन-तीन तास मोबाइलवर अनेकजण ८ ते ९ वाजता बेडवर पडतात. परंतु, मोबाइल बघत असतात. मोबाइल बघण्याच्या नादात दोन ते तीन तास कसे निघून जातात हे कळतही नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास मोबाइलपासून दूर रहावे. यासोबतच लहान मुलांनाही रात्रीच्या वेळेत मोबाईल देऊ नये.
उत्तम झोपेसाठी काय करायला पाहीजे ? सुदृढ दिनचर्या पाळा, झोपण्याच्या किमान एक तास आधी स्मार्टफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटर स्क्रीन आणि टीव्हीपासून डिस्कनेक्ट करा. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधला निळा प्रकाश झोपेत व्यत्यय आणत असतो.
"मोबाइलचा वापर लहानापासून ज्येष्ठांचीही समस्या बनली आहे. मात्र सतत मोबाइलचा वापर घातक आहे. यामुळे निद्रानाश, चिडचिडपणा, डिप्रेशन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे विशिष्ट वेळीच मोबाइलचा वापर करावा, झोपेच्या आधी किमान १ तासापूर्वी मोबाइलचा वापर बंद करावा." - डॉ. विवेक बांबोळे, मानसोपचारतज्ज्ञ