लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी; तसेच शाळांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन, प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. आता शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या '१०० शाळांना भेटी' या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी त्या-त्या क्षेत्रातील आमदार शाळेला भेट देणार असून, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. आमदारांसह, अधिकाराही शाळांना भेट देणार आहे.
काय आहे १०० शाळांना भेटीचा कार्यक्रम२०२५-२६ या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळांना भेट देण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. शाळेतील मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता तपासणीसाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमातून उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी शाळेतील गुणवत्तेचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, शाळांतील भौतिक सुविधा, पोषण आहार, स्वच्छता, खेळ यासंदर्भात ते मार्गदर्शनही करणार आहेत.
आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न१०० शाळांनी भेटी उपक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. यामध्ये शाळांचे ते निरीक्षण करणार आहेत. या उपक्रमातून शाळांबद्दल पालक, विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासून तयारी केली जाणार आहे. यामध्ये शाळांमध्ये अधिकाधिक सुविधा पुरविण्यात येणार आहे.
वर्ग १ आणि २ चे अधिकारीही देणार भेटया उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधिनस्थ विविध विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हास्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना वर्षभरात जिल्ह्यातील १०० शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यामध्ये गावातील नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. दरम्यान, पालक, शिक्षकांची सभा होणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार प्रोत्साहन१०० शाळांना भेटी कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, तसेच अधिकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शाळांना भेटी देऊन २ शाळांमधील कामकाजाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा, तसेच इतर सोयीसुविधांचा आढावा घेणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.