Mission Rainbow Vaccination Campaign in 4 villages | १७२ गावात मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहीम
१७२ गावात मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहीम

ठळक मुद्देजि. प. आरोग्य विभागाचा उपक्रम : वेंडली अंगणवाडी केंद्रातून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारपासून जिल्ह्यातील १७२ गावांत मिशन इंद्रधनुष लसीकरणाला सुरवात करण्यात आली. दुर्गापूर परिसरातील ऊर्जानगर वेंडली येथील अंगणवाडी केंद्रात या मोहिमेचे उद्घाटन झाले.
केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीकरण केल्या जाते. ग्रामीण भागात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात वेंडली अंगणवाडी केंद्रातून झाली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्त राठोड, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. जि. प. सदस्य वनिता आसुटकर यांच्या हस्ते वेंडली येथील अंगणवाडी केंद्रात अनुभव सचिन वटे या बालकाला पोलीओ, रोटा व्हायरस, ओपीव्ही, पेंन्टा लस देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मातांना या मोहिमेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य केमा रायपुरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी मेश्राम, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे उपस्थित होते. याकरिता आर्टीस्ट सुभाष सोरते, आरोग्य सहाय्यक मुरलीधर नन्नावरे, आरोग्यसेविका आर. चहांदे, अंगणवाडी सेविका सुनिता वाकडे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

लसीकरणाचे फायदे
बालकांच्या निरोगी जीवनासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकापेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. सदर मोहीम डिसेंबर २०१९, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२० अशा चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. माता व पालकांनी आपल्या बालकांना मिशन इंद्रधनुष अंतर्गत लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.
 

Web Title: Mission Rainbow Vaccination Campaign in 4 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.