कारवाईतील विलंबामुळे मंत्रालयानेही खडसावले

By Admin | Updated: May 16, 2015 01:40 IST2015-05-16T01:40:58+5:302015-05-16T01:40:58+5:30

चंद्रपुरात अवैध बांधकाम फोफावले आहे. पहिल्या टप्प्यात यातील २६ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्तांनी कालबध्द कार्यक्रम आखला होता.

The ministry has also cracked the delay in the proceedings | कारवाईतील विलंबामुळे मंत्रालयानेही खडसावले

कारवाईतील विलंबामुळे मंत्रालयानेही खडसावले

चंद्रपुरातील अवैध बांधकाम : तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश
चंद्रपूर : चंद्रपुरात अवैध बांधकाम फोफावले आहे. पहिल्या टप्प्यात यातील २६ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्तांनी कालबध्द कार्यक्रम आखला होता. मात्र अनेक महिने लोटूनही प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. आता नगर विकास मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून अवैध बांधकामाविरुध्दची कारवाई तात्काळ करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहे.
मागील काही वर्षात शहरात वाट्टेल तसे बांधकाम करण्यात आले आहे. मनपानेही याकडे वेळीच लक्ष दिले नाही. दरम्यान मनपाच्या एका आमसभेत शहरातील वाढत्या अवैध बांधकामाचा मुद्दा उचलून धरण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलीे. अवैध बांधकामे तोडण्याचा कालबध्द कार्यक्रमच मनपाने तयार केला होता. याबाबत आयुक्त सुधीर शंभरकर यांनी एक आदेशच काढला आहे. यात नगररचना विभागाने अवैध बांधकामाची निश्चिती करावी, क्षेत्रीय अभियंत्यांनी त्या स्थळावर जाऊन लाल रंगाने अवैध बांधकामावर नोंद करावी, अग्निशमन अधिकारी आणि प्रभारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून पोलिसांच्या सहकार्याने अवैध बांधकाविरुध्द कारवाई करावी, असे निर्देश होते. पहिल्या टप्प्यात २६ अवैध बांधकामावर ही कारवाई होत असल्याचा तेव्हा बराच गाजावाजा करण्यात आला होता. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही नोटीस बजावण्यापलिकडे कुठलीच ठोस कारवाई महापालिकेकडून झाली नाही. विशेष म्हणजे, मनपा प्रशासनाच्या कालबध्द कार्यक्रमानुसार, मार्चअखेरपर्यंत शहरातील अवैध बांधकामे, निदान पहिल्या यादीतील ती २६ बांधकामांवर कारवाई होणे अपेक्षित होते.
दरम्यान, अवैध बांधकामाविरुध्दच्या कारवाईला विलंब होत असल्याने मनपाच्या नगरसेविका सुनिता लोढिया यांनी १२ मे २०१५ रोजी या संदर्भात नगर विकास मंत्रालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी आयुक्त सुधीर शंभरकर यांना एक पत्र पाठवून नियमानुसार अवैध बांधकामाविरुध्द तात्काळ कारवाई करून कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. आता थेट मंत्रालयानेच याची दखल घेतल्यानंतर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे. केवळ शहरातच नाही, तर शहरालगतच्या नव्या वस्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The ministry has also cracked the delay in the proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.