चिंतलधाब्यातील खाणींचा घाव पर्यावरणावर
By Admin | Updated: November 9, 2014 22:30 IST2014-11-09T22:30:50+5:302014-11-09T22:30:50+5:30
येथून जवळच असलेल्या चिंतलधाबा गावात पोभुर्णा मुख्य मार्गावर अनेक गिट्टी खदान सुरु आहेत. खदान सुरु असलेली जागा खासगी तर काही वनविभागाची आहे. वनविभागाच्या जागेत मौल्यवान साग

चिंतलधाब्यातील खाणींचा घाव पर्यावरणावर
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या चिंतलधाबा गावात पोभुर्णा मुख्य मार्गावर अनेक गिट्टी खदान सुरु आहेत. खदान सुरु असलेली जागा खासगी तर काही वनविभागाची आहे. वनविभागाच्या जागेत मौल्यवान साग वृक्ष उभे असून झुडपी जंगलही मोठ्या प्रमाणात असताना खाणीमुळे या वनसंपदेला धोका पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लाखो रुपयांच्या सागवानाची झाडे खाणीत सापडली असून त्याची मुख्य मुळे तुटली असल्याने ही झाडे कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आक्सापूर- पोंभुर्णा मार्गावरील चिंतलधाबा गावालगत अनेक गिट्टी खाणी सुरु आहेत. मागील अनेक वर्षापासून सदर जागेवर उत्खननाचे काम केले जात आहे. गावातील खासगी तर मोठ्या प्रमाणात वनविभागाची जागा खाणीच्या वापरात सापडली असून यापासून खाणचालकांची मिळकत सुरु आहे. खाणींचा बराच भाग झुडपी जंगलाचा असून खोदकामात अनेक मौल्यवान वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. चिंतलधाबा परिसर वन व खनिज संपदेने स्वयंपूर्ण आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे चालत असून परिसरातील बांधकामासाठी चिंतलधाबा येथील गिट्टीला चांगली मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन सुरुवातीला एक असलेल्या खाणीची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. खासगी खाणी मिळून हा आकडा यापेक्षाही अधिक आहे. चिंतलधाबा येथील खाणी चक्क जंगलात असून खोदकामात येथील जंगलामध्ये आठ ते दहा फूटाचे खड्डे खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असते. सदर खड्डे वेळीच बुजविण्याचे काम अद्यापपर्यंत हाती घेतले नाही. याप्रकारचे अनेक खड्डे या भागात दिसून येत असून अशा खड्ड्यांमुळे चिंतलधाबा येथील मौल्यवान डोंगर पोखरल्या गेले आहे. येथील गिट्टी खाणीत परिसरातील मजूर राबत असून सदर मजुरांना कुठल्याच प्रकारची आरोग्यसुरक्षा पुरविण्यात आली नसल्याची माहिती आहे. विम्याची सुरक्षासुद्धा प्रदान केली नसल्याने मजुरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सीमांकन क्षेत्राबाहेर गिट्टीचे उत्खनन सुरु असल्याचीही माहिती आहे. असे असताना मात्र, जिल्हाप्रशासन व वनविभाग या प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत असून राज्य मार्गालगत भररस्त्यावरील हा प्रकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. (शहर प्रतिनिधी)