मिनी मंत्रालयात गदारोळ
By Admin | Updated: April 24, 2015 00:51 IST2015-04-24T00:51:54+5:302015-04-24T00:51:54+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना दोन-तीन वर्षानंतरही पूर्णत्वास येऊ शकल्या नाही.

मिनी मंत्रालयात गदारोळ
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना दोन-तीन वर्षानंतरही पूर्णत्वास येऊ शकल्या नाही. या योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आजच्या सभेत चांगलेच धारेवर धरले. सत्ताधाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदस्यांनी अखेर सभागृहातच प्रोसेडिंग बुक फाडून व ग्लास फोडून आपला निषेध व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज गुरुवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या सभेत प्रारंभापासूनच विरोधक आक्रमक असल्याचे दिसून येत होते. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी सचिवांना सभा सुरू करण्याचे सांगताच विनोद अहीरकर यांनी विविध योजनांवरून प्रश्नाची सरबत्ती केली. त्यानंतर संध्या गुरुनुले यांचाही आवाज चढला. त्यामुळे काही वेळ दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी अध्यक्षांची बाजू घेतल्याने विरोधक आणखी संतापले. २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षातील जवाहर रोजगार योजनेची व नरेगाची किती कामे झाली आहेत व किती अपूर्ण आहेत, याबाबतचा प्रश्न विनोद अहीरकर यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावर अध्यक्ष संध्या गुरुनुले निरुत्तर झाल्या. अखेर मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी मध्यस्थी करीत नरेग व जवाहर योजनेची कामे जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
त्यानंतर सत्ताधारी गटातील माजी पदाधिकारी राहिलेल्या एका सदस्यांनीच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले. त्यांनी नोटबुक खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. नोटबुक तीन-तीन महिने ठेवून सडवून खराब झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटणार आहात काय, असा संतप्त सवाल सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच उपस्थित केला. महाराष्ट्रात आपले सरकार आहे, पालकमंत्री आपले आहेत, तरीही हे हाल आहेत, अशा शब्दात त्यांनी आपली चिड व्यक्त केली. अखेर देवराव भोंगळे यांनी मधे पडून संतप्त सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाबाबत वृत्तपत्रात बातम्या येत असताना त्याचे साधे खंडण करण्याचे औचित्यही अध्यक्षांनी दाखविले नाही, असा आरोपही अध्यक्ष महोदयांवर करण्यात आला. त्यानंतर सतीश वारजूकर यांनी बांधकाम विभागातील काही प्रकरणावर जाब विचारला. मात्र अध्यक्षांनी याकडे लक्ष न देता वारजूकरांनी उपस्थित केलेल्या विषयाला पध्दतशीर बगल दिली. त्यामुळे समाधान न झालेल्या वारजूकर यांनी चक्क प्रोसेडिंग फाडून व ग्लास फोडून आपला निषेध सभागृहापुढे व्यक्त केला.
दरम्यान आपण २७ मार्च २०१५ च्या बजेटच्या प्रोसेडींगची माहिती मागितली. मात्र ही माहिती न देता उलट दबावतंत्राचा वापर करीत उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सभा संपल्याचे घाईघाईने आदेश दिले, असा आरोप सतीश वारजूकर यांनी केला. एकूणच आजची जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची सभा चांगलीच वादळी ठरली. (शहर प्रतिनिधी)
आराखडा देण्यास नकार
सत्ताधाऱ्यांनी सत्ता स्थापन होताच विकास आराखडा सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला होता. तो आराखडा सभागृहात देण्यासाठी सहा महिन्यांपासून मागणी सुरू आहे. परंतु सभागृहाला अजुनही आराखडा दिला नाही. आलेसूर ग्रामपंचायतीत एमआरईएस अंतर्गत पाच लाख रूपये जास्तीचे खर्च केले हाही विषय गाजला. मजगीच्या कामाची अजूनही एकाही ग्रामपंचायतीला माहिती दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्ष निरूत्तर झाले. एमआरईजीएस मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, यावरही सभागृहात उत्तर देण्यास अध्यक्ष निरूत्तर झाले. गुरूवारच्या सभेत एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष समाधानकारक देऊ शकले नाही. त्यामुळे नोटबुक खरेदीमध्ये ५० लाखांचा भ्रष्टाचार, जिल्ह्यात दुधाचे प्रमाण किती वाढले याचेही उत्तर सभागृात कोणीही देऊ शकले नाही. विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकार उत्तर न दिल्याने तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.