मिनी मंत्रालयात घोडेबाजाराला वेग

By Admin | Updated: September 20, 2014 01:31 IST2014-09-20T01:31:26+5:302014-09-20T01:31:26+5:30

अवघ्या एक दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषदेच्या

Mini Mantralaya horse racing in the market | मिनी मंत्रालयात घोडेबाजाराला वेग

मिनी मंत्रालयात घोडेबाजाराला वेग

रस्सीखेच होऊ शकते एका मतासाठी : नेते सदस्यांच्या संपर्कात
चंद्रपूर :
अवघ्या एक दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घोडाबाजार तेजीत आला आहे. ५७ सदस्यसंख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २९ सदस्यांची गरज आहे. हे गणित जुळविताना ‘हातचा एक’ घ्यावा लागणार असल्याने राजकारणाच्या घोडाबाजारात सदस्यांचे भावही वधारले आहेत.
२१ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या वेळी अध्यक्षपद ओबिसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने आणि राष्ट्रवादी वगळता बहुतेक सर्व प्रमुख पक्षांकडे या प्रवर्गातील सदस्य असल्याने स्पर्धाही वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच अपवाद वगळता सर्वच पक्षांतील सदस्य देवदर्शनाला रवाना झाले आहेत. या सहलीमध्ये मनाजोगी खरेदी करण्याचा योग साधत हे सदस्य रविवारी सकाळी गुप्त ठिकाणी पोहचत आहेत.
काँग्रेस व भाजपा हे संख्याबळाने मोठे असलेले पक्ष सत्ता स्थापण्याच्या तयारीत असले तरी अन्य पक्षांची मदत त्यांना घ्यावी लागणार आहे. गेल्या वेळी १८ सदस्यांच्या बळावर भाजपाने केवळ अध्यक्षपद घेऊन जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीच्या मदतीने झेंडा फडकविला होता. मात्र सर्व सभापतीपदे मित्रपक्षांकडे गेल्याने भाजपाच्या अध्यक्षांची ही टर्म सह्या मारण्यापलिकडे पुढे सरकली नव्हती. राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद व सभापतीपद आपल्याकडे ठेवून भाजपाची गोची केली होती. मनसेकडे केवळ एकच सदस्य असतानाही त्यांनीही सभापतीपद मिळविले होते. यावेळी भाजपाने संध्या गुरनुले यांना अध्यक्षपदासाठी समोर करून जुनीच मैत्री कायम राखण्याचा प्रयत्न करीत सदस्यांचे देवदर्शन घडवून आणले. मात्र मुंबईतील बदलत्या राजकारणामुळे त्याला किती साथ मिळते, हे रविवारी दिसणार आहे.
काँग्रेसलाही अध्यक्षपद हवे असले तरी त्यांची गाडी सहलीला निघण्याआधीच भाजपाची गाडी सर्वांना घेऊन रवाना झाली होती. त्यामुळे केवळ फोनाफानी करण्याशिवाय काँग्रेसमधील गटातटाच्या नेत्यांना दुसरा उपाय उरलेला नव्हता. फोडाफाडीच्या राजकारणात ते किती यशस्वी होतात, हे निकालानंतर दिसणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कितपत इच्छुक ?
४गेल्या वेळच्या जिल्हा परिषदेतील अभद्र युतीचा कित्ता यावेळीही गिरविण्यात स्थानिक राष्ट्रवादीचे नेते कितपत इच्छुक आहेत, याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. भाजपा-राष्ट्रवादीची ही मैत्री गेल्या वेळी राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी गेल्या वेळीही या हातमिळवणीला विरोध केला होता. मात्र त्यांचे काही चालले नव्हते. या वेळीही ते विरोधात आहेत. तिकडे राज्यभर आम्हाला शिव्या देत फिरायचे आणि येथे सत्तेसाठी मदत आम्हालाच मागायची हा प्रकार कितपत स्विकारार्ह आहे, असा प्रश्न सध्या ते आपल्याच पक्षातील स्थानिक नेत्यांना विचारत आहेत. यामुळे राष्ट्रवादीची साथ भाजपाला या वेळी कशी व किती मिळते, यावर अध्यक्षपदाचे गणित अवलंबून आहे.

 

Web Title: Mini Mantralaya horse racing in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.