विरूर वनपरिक्षेत्रात लाखोंची वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:30 IST2018-07-03T22:30:03+5:302018-07-03T22:30:21+5:30

विरूर वनपरिक्षेत्रात लाखोंची वृक्षतोड
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. राजुराच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना अहवाल पाठवून ५० सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे नमूद केले आहे. मात्र अजूनपर्यंत कुणावरही कारवाई झालेली नाही.
विरूर वनपरिक्षेत्रातील अंतरगाव नियत क्षेत्र २ मध्ये ४१ सागवान वृक्षांची कत्तल झाली असून या वृक्षांची किमंत १ लाख ६७ हजार १३८ एवढी आहे. उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालामध्ये, वनविभागात कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येत असल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विरूर वनपरिक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे येथील वन अधिकाऱ्यांवर कारवाईचा अहवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही पाठविला आहे. त्यामुळे लवकरच वन अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.
विरूर वन परिक्षेत्रातील अंतरगाव बिटामधील वृक्षतोडीचा अहवाल उपवनसंरक्षक चंद्रपूर यांच्याकडे पाठविला आहे. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून नक्कीच कारवाई केली जाईल.
- ए. बी. गर्कल
उपविभागीय वन अधिकारी, राजुरा