कुटुंब नियोजन अनुदानाचा लक्षावधींचा घोटाळा

By Admin | Updated: May 21, 2015 01:23 IST2015-05-21T01:23:53+5:302015-05-21T01:23:53+5:30

तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात यंदा कुटुंब नियोजन आणि सुरक्षा जननी योजनेच्या अनुदानात सुमारे चार लाखांचा घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.

Millennium scam of family planning grants | कुटुंब नियोजन अनुदानाचा लक्षावधींचा घोटाळा

कुटुंब नियोजन अनुदानाचा लक्षावधींचा घोटाळा

कोरपना: तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात यंदा कुटुंब नियोजन आणि सुरक्षा जननी योजनेच्या अनुदानात सुमारे चार लाखांचा घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने अधिकोषातून सदर राशी काढून लाभार्र्थींना वितरित करण्याऐवजी स्वत:च राशीसह पसार झाल्याने पाचशेवर लाभार्थी आता हातत चोळत बसले आहेत.
या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा अंतर्गत या केंद्रातून यंदा सुमारे ३५० महिला लाभार्र्थींच्या गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातून नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या व्यतिरिक्त राजुरा तालुक्यातील देवाडा अंतर्गत काही उपकेंद्रातीलही शस्त्रक्रिया पार पडल्या. दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थीस प्रत्येकी ६०० रुपये तर सर्वसाधारण (एपीएल) लाभार्र्थींसाठी २५० रुपये असे शासनाकडून शस्त्रक्रिया झाल्याक्षणी रोख अनुदान दिले जाते. याशिवाय शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणाऱ्या (प्रमोटर्स) आरोग्य सेविकेस प्रत्येकी १५० रुपये रोख देण्यात येते.
यंदा जिल्हा परिषदेकडून नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे कुटुंब नियोजनाचे अनुदान येण्यास उशीर झाला. त्यामुळे वेळेवर अर्थात शस्त्रक्रिया झाल्याक्षणी अनुदान वितरण झाले नाही. नेमकी हीच बाब घोटाळ्यासाठी कारणीभूत ठरली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेच अनुदान राशीसाठी अर्ज करावा लागतो. त्याच अर्जात राशी प्राप्त झाली म्हणून स्वाक्षरी केली जाते. गडचांदुरातील ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने अग्रीम स्वरूपात बऱ्याच लाभार्र्थींकडून असे राशी मिळाल्याचे अर्ज भरुन स्वत:कडे जमा केले. अनुदान येताच आपणास रोख राशी देण्यात येईल, असे लिपिकाने सांगितल्याने लाभार्र्थींचा विश्वास बसला. वारंवार चकरा मारण्याची कटकट नको म्हणून बऱ्याच महिला लाभार्थ्यांनी हे अर्ज भरुन दिले.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीनुसार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने सदर अनुदान ग्रामीण रुग्णालयाच्या खात्यात वळते केले. त्या अनुषंगाने लिपिकाने वितरणासाठी अधिकोषातून अनुदान काढले. मात्र २० ते २५ लाभार्र्थींना अनुदान दिल्यानंतर उर्वरित राशीसह लिपिक पसार झाला. सुमारे तीन महिन्याचा कालावधी लोटूनही तो गडचांदुरात परतलाच नाही. त्यामुळे लाभार्थी आणि आरोग्य सेविकांनी ही बाब ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कळसकर यांच्या कानावर टाकली. त्यांनी लेखी तक्रारी देण्याचे सूचविले. मात्र अद्यापपर्यंत कुणीही लेखी तक्रार दिली नाही.
उल्लेखनीय आहे की, अनुदानाची लक्षावधी राशी घेऊन पसार झालेल्या या लिपिकाने आरोग्य सहसंचालक कार्यालयाशी संधान साधून गडचांदुरातून थेट नागपूरला आपले स्थानांतरण करवून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे, या अपहारित राशीचा हिशेब न घेताच त्या लिपिकाला तातडीने सोडण्याचा धक्कादायक प्रकारही घडला.
त्यामुळे पाणी बऱ्याच ठिकाणी मुरत असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ग्रामीण रुग्णालय गडचांदूर यांच्याकडे कुटुंब नियोजनासाठी दारिद्र्य रेषेखालील लाभार्र्थींसाठी १ लाख ७३ हजार, सर्वसाधारणकरिता १ लाख आणि पुरुष नसबंदीसाठी ९ हजार असे एकूण २ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. याशिवाय जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थीसाठी एक लाख ३७ हजार ९०० रुपये अनुदानही वळते करण्यात आले. आशा वर्कर आणि लाभार्र्थींना अद्यापही सदर अनुदान मिळाले नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर हा घोटाळा सुमारे चार लाखावर असल्याचे आता बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Millennium scam of family planning grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.