एमआयडीसीतील उद्योगांना महागाईचा फटका

By Admin | Updated: September 13, 2014 23:47 IST2014-09-13T23:47:31+5:302014-09-13T23:47:31+5:30

शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल

MIDC industries face inflation | एमआयडीसीतील उद्योगांना महागाईचा फटका

एमआयडीसीतील उद्योगांना महागाईचा फटका

चंद्रपूर : शासनाचे अन्यायकारक औद्योगिक धोरण, वीज, कोळशाचा अपुरा पुरवठा तसेच दरवाढ आदी कारणांमुळे चंद्रपूर एमआयडीसीतील लहान-मोठे उद्योग बंद पडत असून मागील काही वर्षांत येथील तब्बल दीडशेंवर उद्योग बंद झाल्याची माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर येथे पत्रपरिषदेत दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात आणि शहरात मागील दोन वर्षात उद्योगांचा विकास नगण्य झाला आहे. जिल्ह्यातील उद्योगांकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष, वीज दरवाढ आणि कोळशाचा अपुरा पुरवठा यासह प्रदूषणाचे कारण पुढे करून जिल्ह्यात नवीन उद्योगांना असलेली बंदी यामुळे औद्योगिक विकास खुंटला आहे. याचा फटका जुन्या उद्योगांना बसत असून अनेक उद्योग बंद झाले आहेत तर, काही उद्योजकांवर सुरू असलेले उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. एमआयडीसीमध्ये सुरुवातीला २३५ उद्योग सुरू झाले होते. मात्र, नंतरच्या काळात दीडशेंवर उद्योग बंद झाले असून आजमितीस केवळ ८० उद्योग सुरू आहेत. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकास वाढीला प्रोत्साहन देण्याची गरज असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा विषय विधानसभा, लोकसभेत रेटावा अशी मागणी रुंगठा यांनी केली.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रीस इंडस्ट्रीज, चमन मॅटेलिक, कोल वॉशरिज यासारखे मोठे उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे हजारावर युवकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ताडाळी एमआयडीसी येथे नवीन उर्जा प्लांट उभारण्यात आला आहे. परंतु थर्मल पॉवर स्टेशनचे पीपीए न झाल्यामुळे ऊर्जा निर्मिती प्लांट बंद पडत आहेत. मूल एमआयडीसीतील उद्योगधंदेही बंद होत आहेत. अशावेळी जिल्ह्यातील उद्योगवाढीला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. चंद्रपूर हे औद्योगिकदृष्ट्या विदर्भातील नागपूरनंतर दुसरे महत्त्वाचे शहर आहे. विदर्भातील सर्वाधिक महसूल देणारे शहर असून कोळसा खाणी, जंगल, पाणी व अन्य खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमाजवळ असल्याने या राज्यातील उद्योजकांना चंद्रपूर येथे विविध उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करता येणार आहे.
मात्र, राज्यशासन जिल्ह्यातील उद्योगधोरणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप रुंगठा यांनी केला. यावेळी श्याम कुंदोजवार, प्रदीप बुक्कावार, राजेंद्र चौबल, शेख रहेमान पटेल आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: MIDC industries face inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.