जिल्हा परिषदेची सभा अर्ध्या तासात गुंडाळली
By Admin | Updated: July 22, 2014 23:56 IST2014-07-22T23:56:00+5:302014-07-22T23:56:00+5:30
जिल्हा परिषदेने २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सादर केला होता. यात सुधारणा किंवा मंजुरी देता आली नव्हती.

जिल्हा परिषदेची सभा अर्ध्या तासात गुंडाळली
चंद्रपूर : जिल्हा परिषदेने २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सादर केला होता. यात सुधारणा किंवा मंजुरी देता आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी विशेष सभा आयोजित करून मागील अल्पसंकल्पातील त्रुट्या दूर करून अवघ्या अर्ध्या तासात सभा गुंडाळली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्या अध्यक्षतेथाली दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली. प्रथम मागील अल्पसंकल्पावर चर्चा केल्यानंतर त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्याचे अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी आचारसंहितेच्या काळात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही विभागाकडून सुधारणा करण्याच्या सूचना आल्या होत्या. मात्र तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकारी गिरी यांनी विभागाकडून आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गिरी यांच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती कुंभरे यांनी दिली.
शेतामध्ये उत्पादित माल बाजार समितीत विक्रीला आणणे सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा शेष फंडातून ‘फायबर कॅरेट’ देण्याची योजना जि.प. सदस्य वानखेडे यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली होती. जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शेतकरी हिताच्या या योजनेला मंजुरी दिली आहे. सध्यास्थितीत शेतकऱ्यांना ताडपत्री, सौरकंदिल व कुंपणासाठी काटेरी तार पुरविले जातात. त्यामुळे फायबर कॅरेट पुरवून शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य राहावा आणि त्याची चांगल्या पद्धतीने वाहतूक व्हावी, हाच या योजनेमागील उद्देश असल्याचे वानखेडे म्हणाले. दरम्यान, जिल्हा परिषदेने यावर्षी सदस्यांना देण्यासाठी लेदर बॅगची खरेदी केली. मात्र त्या बॅग सदस्यांना दिल्या नसल्याने संताप व्यक्त केला गेला. (नगर प्रतिनिधी)