चंद्रपूर : कोरोना संकटकाळात व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात हीच स्थिती आहे. खासगी रुग्णालयातील खर्च परवडण्यासारखा नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. हे लक्षात घेता आ. किशोर जोरगेवार यांनी रामनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रविवारी रात्री १० व्हेंटिलेटर व १४ ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, डाॅ. बंटी रामटेके, डाॅ. किन्नाके आदींची उपस्थिती होती. कोरोनाकाळात रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आ. जोरगेवार यांनी महापालिकेला १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पालिकेचेही सर्व सोयी- सुविधांनीयुक्त कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. दरम्यान, रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड सुरू करता येईल इतके साहित्य उपलब्ध असतानाही तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. हे लक्षात येताच त्यांनी संबंधितांना बोलावून काम करवून घेतले.
वैद्यकीय महाविद्यालयात १० व्हेंटिलेटर तर १४ ऑक्सिजन बेड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST