विज्ञान युगातही रोगराईवर भोंदुगिरीने उपाय

By Admin | Updated: November 2, 2014 22:32 IST2014-11-02T22:32:36+5:302014-11-02T22:32:36+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरांमुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे.

Measures of disease in pandemics in science age | विज्ञान युगातही रोगराईवर भोंदुगिरीने उपाय

विज्ञान युगातही रोगराईवर भोंदुगिरीने उपाय

चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरांमुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे. परंतु आताही ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा अंधार कायम आहे. ग्रामीण भागात आजसुद्धा चक्क धान पिकांच्या आजारावरही भोंदूगिरीचा आश्रय घेऊन उपचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशात विज्ञानाने आज बऱ्याच क्षेत्रात भक्कम प्रगती केली असली तरी आजही ग्रामीण भागातील खेड्यात बऱ्याच ठिकाणी पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा पोहचली नाही. त्यातही दुर्गम आदिवासी भागात अंधश्रद्धेचे मूळ खोलवर रुजलेले असल्याने व पुरेशी आरोग्य सेवा पोहचलीच नसल्याने विविध आजारावर अंधश्रद्धेतून भोंदूबाबांकडून उपचार केले जातात. हा प्रकार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागामधील प्रत्येक खेड्यात पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने आदिवासीबहुल गावामध्ये आतासुद्धा तंत्रमंत्र व जादूटोणाचे प्रकार आढळत आहे. ग्रामीण परिसरात जनावरांवर व धानावर अचानक एखाद्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास गावातील गुरे मृत्यूच्या खाईत जातात किंवा वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात. अशावेळी मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे ‘मरीमायचा प्रकोप’ ही भावना काही गावकऱ्यांचा मनात असते. यावर तोडगा म्हणून गावातील सर्व नागरिकांच्या सहमतीने बैठक घेऊन गावाची शांती करण्यासाठी जादूटोना, तंत्रमंत्र, भूतप्रेत उतरवण्यासाठी गाव बांधणीची योजना आखली जाते.
गाव बांधण्याचा या अघोरी प्रकारासाठी दूरवरुन बाहेरील पंडे-पुजारी व तांत्रिक यांच्याशी पैशाची बोलणी करून तांत्रिकांना बोलाविण्यात येते. यासाठी समस्त गावकरी वर्गणी करून पैसा गोळा करून साधनुकीसाठी तसेच तांत्रिकांना मोबदला देण्यासाठी सोबतच पूजा सामग्री, धागेदोरे, लिंबू, कोंबडा, दारू असे बरेचसे साहित्य खरेदी करून हवन पूजन करण्यात येते. या हवन पूजन काळात गावातील कोणीही नागरिक गावाबाहेर जाणार नाही आणि कोणतेही खासगी कार्य यावेळी होणार नाही, असे तांत्रिकाकडून फर्मान सोडण्यात येते.बऱ्याच अटी ठेवण्यात येत असतात.
विशेष म्हणजे, अनिष्ट प्रथा व चालीरिती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यांना अपयशच मिळत आहे. नागरिकांमध्ये अद्यापही वैज्ञानिक दृष्टी नसल्याचे जाणवते. आता नवीन जादूटोणाविरोधी कायद्याने या गोष्टींना आळा बसण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज निश्चितच आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Measures of disease in pandemics in science age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.