कन्नमवारांच्या पुतळा स्वच्छतेवरून महापौरांची टोलवाटोलवी
By Admin | Updated: January 13, 2016 00:53 IST2016-01-13T00:53:59+5:302016-01-13T00:53:59+5:30
चंद्रपूरचे सुपुत्र असलेले दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचा चंद्रपुरातील पुतळा सध्या स्वच्छतेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे.

कन्नमवारांच्या पुतळा स्वच्छतेवरून महापौरांची टोलवाटोलवी
गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
चंद्रपूरचे सुपुत्र असलेले दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचा चंद्रपुरातील पुतळा सध्या स्वच्छतेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे. कन्नमवारांच्या जयंती दिनी पुतळा आणि हा परिसर कुणीही स्वच्छ न केल्यामुळे अखेर नागरिकांनी नळावरून पाणी घेऊन पुतळा स्वच्छ केला होता. हा पुतळा जिल्हा परिषदेने बांधलेल्या वसंत भवनच्या हद्दीत असल्याने पुतळ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे, अशी भूमिका महापौर राखी कंचर्लावार यांनी घेतली आहे, तर पुतळ्यांची आणि त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी कधीपासून जिल्हा परिषदेकडे आली, असा सवाल जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी केला आहे.
कन्नमवारांची जयंती होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप कुणाचाही स्वच्छतेचा झाडू या पुतळा परिसरात फिरला नाही. परिणामत: चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या जटपुरा गेटजवळील वसंत भवनसमोर असलेला या महाराष्ट्र भूषणाचा पुतळा आजही झुडूपात आणि आडव्याउभ्या वाढलेल्या कचऱ्यातच उभा आहे.
१० जानेवारीला कन्नमवार जयंतीच्या दिवशी या पुतळ्याची असलेली उपेक्षा बघून ‘लोकमत’ने वस्तुस्थिती चव्हाट्यावर आणली होती. त्यावर ११ जानेवारीला ‘लोकमत’जवळ प्रतिक्रिया देताना महापौर राखी कंचर्लावार यांनी या अस्वच्छतेबाबत दखल घेऊ आणि संबंधितांना जाब विचारू असे म्हटले होते. मात्र दुसऱ्या दिवशीही स्वच्छता न दिसल्याने विचारणा केली असता, पुतळा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात आहे, त्यामुळे स्वच्छतेची जबाबदारी त्यांची होती. आपल्याकडे कुणाचे तसे पत्रच आले नाही, त्यामुळे स्वच्छता करण्याचा विषयच येत नाही, असे सांगत चक्क चंद्रपूरकरांना आश्चर्यात पाडले आहे.
दरम्यान, महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेकडून होत असलेल्या पुतळ्याच्या या उपेक्षेबद्दल नागरिकांनी प्रचंड चिड व्यक्त केली आहे. क्षेत्र कुणाहेची असो, स्वच्छतेची जबाबदारी महानगर पालिका कशी काय टाळू शकते, असा प्रश्न आता सवर स्तरातून उपस्थित होत आहे. चंद्रपूर जिल्हा बेलदार समाज संघटनेचे सचिव अवधुत कोट्टेवार यांनीही या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ज्या जिल्ह्यातून मोठे झाले आणि घडले त्या कन्नमवारांच्या महानतेची कुणालाही जाणीव होत नसेल तर आपल्यासारखे कृतघ्न आपणच ठरू शकतो, अशा शब्दात ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे.
‘तो’ पुतळा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात : महापौर
चंद्रपुरातील वसंत भवनसमोर असलेला पुतळा महानगर पालिकेच्या कक्षात येत नसून जिल्हा परिषदेच्या कक्षात येतो. त्यामुळे या पुतळयाच्या आणि पुतळा परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे, अशी प्रतिक्रिया महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली. त्या म्हणाल्या, मागील वर्षी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांना सांगून आपण पुतळ्याच्या गेटची रंगरंगोटी करून घेतली होती. शहरातील कोणत्याही ले-आऊट अथवा कोणत्याही ठिकाणच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे अर्ज आणावा, आपण गावभर स्वच्छता करून देऊ. मात्र या पुतळयाच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे कुणाचाही अर्ज आला नव्हता, त्यामुळे स्वच्छता करण्याचा प्रश्न येत नाही, असेही त्या म्हणाल्या. एवढ्या वर्षांपासून जयंती साजरी करणाऱ्या संबंधित समाज संघटनेच्या पदाधिकांना तरी हे क्षेत्र कुणाकडे आहे, हे माहीत असायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
पुतळे कधीपासून जिल्हा परिषदेकडे आले ? : भोंगळेंचा सवाल
महानगर पालिकेच्या क्षेत्रातील पुतळे जिल्हा परिषदेकडे कधीपासून आले, याचे उत्तर महापौरांनी द्यावे, असा प्रतिप्रश्न जिल्हा परिषदेने बांधकाम आणि शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही पुतळ्याच्या स्वच्छतेची आणि देखभाल दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असते. हे शहर आणि पुुतळा महानगर पालिकेच्या क्षेत्रात येत असल्याने महापौर ही जबाबदारी कशी काय काय टाळतात, याचे आश्चर्य आहे, असेही ते म्हणाले. वसंत भवनसमोर हा पुतळा असल्याने दर २६ जानेवारी आणि १५ आगस्टला जिल्हा परिषदेकडून तेथे स्वच्छता होते. याचा अर्थ महानगरपालिकेने आपली जबाबदारी जिल्हा परिषदेवर ढकलावी, असा होत नाही, असेही ते म्हणाले.