टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

By Admin | Updated: March 18, 2015 01:20 IST2015-03-18T01:20:06+5:302015-03-18T01:20:06+5:30

खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

In the mathematical calculation of farmers, | टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

टक्केवारीच्या गणितात शेतकऱ्यांची गळचेपी

चंद्रपूर : खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रबी हंगामावर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. यावर्षी रबी पिकाला सतत अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाचे अनुदानासाठी ठरवलेले निकष शेतकऱ्यांसाठी गळचेपी ठरत असल्याने नुकसान होऊनही जिल्ह्यातील शेतकरी मात्र शासकीय मदतीस अपात्र ठरले आहेत.
रबी हंगाम ऐन हातात आलेला असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशावर पाणी फेरले. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू पिक वादळामुळे जमीनीवर झोपले. तर कापूस पिकांचे बोंड पावसामुळे काळे पडले. हरभरा पिकालाही माती लागल्याने त्याची पत घसरली. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले. मात्र या सर्व्हेक्षणात नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्के पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत.
शासनाच्या निकषानुसार नुकसान भरपाईसाठी ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्या आत आली आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल याची कोणतीही आशा नाही. तसे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.
शासनाचे निकष शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने नुकसान होऊनही शासनाच्या आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असल्याचे शेतकरी आजही कसे जगावे, या विवंचनेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कृषी विभाग म्हणतो, नुकसान निरंक

यावर्षी रबी पिकांना अवकाळी पावसाचा फटका चार ते पाच वेळा बसला असला तरी, यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. नुकसानीचा अहवाल निरंक असून शासनाकडून मदत मिळेल अशी कोणतीच अपेक्षा नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
फक्त तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या नजरअंदाज अहवालात फक्त तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात चंद्रपूर तालुक्यात हरभरा पिकाचे ७० हेक्टरवर नुकसान व गहू पिकाचे २२५ हेक्टरचे नुकसान, ब्रह्मपुरी तालुक्यात हरभराचे १५९ हेक्टर व गहू पिकाचे ७७ हेक्टर व इतर पिकाचे ३२०७ हेक्टर तर सिंदेवाही तालुक्यात हरभरा पिकाचे ३० हेक्टरवर व गहू पिकाचे २५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ही टक्केवारी ५० च्या आत आहे.
वीज पडून दोन गायी ठार
सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे वीज पडून दोन गायी ठार झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारडी येथे घडली. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भास्कर राऊत यांच्या दोन गायींवर वीज पडल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले असून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Web Title: In the mathematical calculation of farmers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.