वणव्याचा आगडोंब; बांबू डेपो आणि पेट्रोलपंप जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 10:17 AM2022-05-23T10:17:12+5:302022-05-23T10:27:22+5:30

रविवारी घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर-अहेरी व कोठारी मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली.

Massive fire in Ballarpur wood, bamboo depot, hundreds of forest resources burnt out in fire | वणव्याचा आगडोंब; बांबू डेपो आणि पेट्रोलपंप जळून खाक

वणव्याचा आगडोंब; बांबू डेपो आणि पेट्रोलपंप जळून खाक

Next
ठळक मुद्देआग विझविण्याचे प्रयत्न निष्फळबल्लारपूर तालुक्यातील जंगलाला वेढाभीषण आगीमुळे अहेरी मार्गावरील वाहतूक बंद

बल्लारपूर, कोठारी, पळसगाव (चंद्रपूर) : बल्लारपूर तालुक्यातील कळमना व दहेलीच्यामध्ये असलेल्या जंगलाला अचानक लागलेला वणवा रविवारी दुपारनंतर पसरत गेला. कळमनानजीक असलेल्या बांबू डेपोला त्याने सर्वांत आधी कवेत घेतले. त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. जवळच असलेला कळमना येथील पेट्रोलपंपही रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आगीच्या कवेत आला. रात्री उशिरापर्यंत आगडोंब उसळत होता. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे चालविलेले प्रयत्न तोकडे ठरले. कारण या संपूर्ण परिसरात शिरकाव करणेच अवघड झाले होते.

ही माहिती तेथील घटनास्थळाजवळ असलेल्यांनी अग्निशमन दलाला दिली; परंतु उन्हाळा असल्यामुळे पाहता पाहता संपूर्ण डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या येऊनही आग विझत नसल्यामुळे डेपोतील सर्व बांबू जळून खाक झाले.

रविवारी घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर-अहेरी व कोठारी मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. या आगीची माहिती मिळताच तहसीलदार राईचवर तसेच बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अग्निशमन दलाला कोणत्याही प्रकारचे यश आले नाही. अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे; परंतु संपूर्ण डेपोला आगीने विळखा घातल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळाजवळ जाऊ शकल्या नाहीत. 

दूरवर आगीचे चटके

बांबू डेपो चंद्रपूर-अहेरी मार्गांवर असल्यामुळे या डेपोच्या आगीचे चटके येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशाला बसत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. अग्निशमन वाहनाच्या पथकालाही आग विझविणे शक्य होत नसल्याचे परिस्थितीवरून दिसून येते. आगीचे चटके दूरपर्यंत जाणवत असल्याने आगीच्या जवळ जाणे कुणालाही शक्य नव्हते.

बॉम्बस्फोटाप्रमाणे आगीचे लोळ

डेपोच्या बाजूलाच काही अंतरावर कळमना येथील भारत पेट्रोलियमचा साहील पेट्रोलपंपही पाहता पाहता आगीच्या विळख्यात सापडला. एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट व्हावा, असा आगडोंब घटनास्थळावर आहे. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Massive fire in Ballarpur wood, bamboo depot, hundreds of forest resources burnt out in fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.